यकृताचा पहिला शत्रू मद्य

आपल्या देशामध्ये मद्यपाना विषयी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून चर्चा होत असते. महात्मा गांधींचे अनुयायी मद्याच्या थेंबालाही स्पर्श न करण्याच्या मताचे असतात आणि कठोर दारूबंदीचे समर्थक असतात. मात्र आपल्या जीवनावर कसलाही गंभीर परिणाम न होता रोज मर्यादित स्वरुपात मद्यपान करणारेही अनेक लोक आहेत. त्यामुळे असे लोक मद्याच्या विरोधात नसतात. मद्यपान हे वाईटच आहे हे मानायला ही मंडळी तयार नसतात. या मर्यादित स्वरूपात मद्यपान करणार्‍या लोकांच्या शरीरावर काही परिणाम मात्र जरूर होत असतात. ते ङ्गार ठळकपणे दिसत नसले तरी असतात हे खरे. अशा मर्यादित मद्यपींच्या यकृतावर काही गंभीर परिणाम होत असतात. शेवटी मद्य हे काही शरीराला उपकारक ठरणारे औषध नक्कीच नाही. त्यामुळे ते शरीरात जाते तेव्हा मर्यादित प्रमाणात का होईना शरीरावर परिणाम करतेच. त्या परिणामात पहिला बळी यकृताचा पडत असतो. 

सुपरस्टार राजेश खन्ना याचे निधन नेमके कशाने झाले याविषयी आता चर्चा व्हायला लागलेली आहे. राजेश खन्ना हा यकृताला संसर्ग झाल्यामुळे मरण पावला असे आता बातम्यांतून प्रसिद्ध झाले आहे. परंतु गेल्या वर्षभरामध्ये तो कोणत्याच औषधोपचाराला प्रतिसाद देत नव्हता, असेही त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. आपले शरीर असा प्रतिसाद देत नाही हे ज्या दिवशी राजेश खन्नाला जाणवले त्या दिवशी त्याने आता खेळ खलास झालेला आहे हे ओळखले. प्रतिसाद न देण्याचे कारण यकृताचा कर्करोग हे होते हे आता सांगितले जायला लागले आहे. यकृताला झालेला संसर्ग असो की यकृताचा कर्करोग असो राजेश खन्नाचा मृत्यू यकृताच्या काही ना काही विकृतीने झालेला आहे हे मात्र नि:संशय आहे आणि हे यकृत बिघडण्याचे कारण मद्यपान हेच आहे. 

राजेश खन्ना याचे निधन झाले तेव्हा त्याचे वय ६९ वर्षे होते. तसे हे वय कमी नाही. मात्र सध्या सुखवस्तू लोकांचे जीवनमान वाढलेले आहे. त्या मानाने राजेश खन्नाचा मृत्यू कमी वयात झालेला आहेच, परंतु साधारण ६५ व्या वर्षांपासून वायाच गेलेला होता. त्याचे कामातून जाण्याचे हे वय ङ्गारच कमी होते आणि याचे एकमेव कारण मद्यपान हे होते. लिव्हर किंवा यकृत हा शरीराचा ङ्गार मोठा आधार असतो. आपल्या अन्न घटकातील पोषक द्रव्यांवर प्रक्रिया करून त्या द्रव्यातील पोषक भाग आपल्या शरीराच्या विविध अवयवांना उपलब्ध करून देण्याचे काम यकृत करत असते. त्याशिवाय अन्नातील आणि श्‍वासातून आलेल्या हवेतील विषारी पदार्थ शरीराच्या विविध अवयवांपर्यंत पोचू नयेत याची काळजी सुद्धा यकृत घेत असते. शरीराच्या रक्तवाहिन्या कधी कठीण होतात तर कधी रक्तामध्ये मेदाच्या गुठळ्या तयार होऊन रक्त प्रवाह खंडित होतो. अशा गुठळ्या तयार होऊ नयेत याची काळजी घेण्याचे काम यकृत करत असते. पण हेच यकृत मद्यपानामुळे बाधित होते.  म्हणून मद्यपानाचा आपल्या शरीरावर होणारा नेमका गंभीर परिणाम कोणता हे यावरून लक्षात येते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment