माढा मतदारसंघात भाऊबंदकी

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये काही मतदारसंघातील लढती विलक्षण रंगणार आहेत. परंतु सोलापूर जिल्ह्यातल्या माढा मतदारसंघातील लढत सर्वाधिक लक्षणीय आणि नाट्यमय ठरणार आहे. सोलापूर जिल्ह्यात पूर्वी सोलापूर आणि पंढरपूर असे दोन लोकसभा मतदारसंघ होते. परंतु मतदारसंघांच्या पुनर्रचनेत पंढरपूर मतदारसंघ रद्द झाला आणि माढा हा नवा मतदारसंघ निर्माण झाला. या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ येतात. असा हा नवा मतदारसंघ निर्माण होताच त्यातून पहिल्यांदा निवडणूक लढविण्याचा मान २००९ साली केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मिळवला.  या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य असल्यामुळे शरद पवार हे विजयी झाले यात काही नवल नाही. पण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुभाष देशमुख यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली. शरद पवार समोर उभे असताना सुद्धा देशमुख यांनी अडीच लाख मते मिळवली. त्यांची मते बघून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा आश्‍चर्य व्यक्त केले. आता शरद पवार यांनी निवृत्ती स्वीकारली असल्यामुळे या मतदारसंघातला राष्ट्रवादीचा उमेदवार बदलणे अपरिहार्य होते. त्यासाठी सातारा जिल्ह्यातले रामराजे निंबाळकर आणि सोलापूर जिल्ह्यातले विजयसिंह मोहिते-पाटील ही दोन नावे समोर होती. श्री. शरद पवार यांनी मोहिते-पाटलांच्या नावाला दुजोरा दिला. 

भाजपाच्या आघाडीत मात्र ही जागा भाजपाने स्वाभीमानी शेतकरी संघटनेला दिली. गेल्या निवडणुकीत भाजपाला शरद पवारांच्या मुकाबल्यात अडीच लाख मते मिळाली होती, त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाने सोडायला नको होता असे त्यावेळचे उमेदवार सुभाष देशमुख यांचे मत आहे. आपण यावेळी उभे राहिलो असतो तर नक्की निवडून आलो असतो अशी त्यांची भावना आहे. मात्र गोपीनाथ मुंडे यांना ही गोष्ट मान्य नाही, म्हणून त्यांनी ही जागा स्वाभीमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. परिणामी सुभाष देशमुख नाराज आहेत.  स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सदुभाऊ खोत हे या मतदारसंघात विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात उभे आहेत. त्यांच्या संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ज्या पद्धतीने हातकणंगले मतदारसंघात विजय प्राप्त केला त्या पद्धतीने आपणही माढा मतदारसंघ जिंकून घेऊ शकू असा विश्‍वास त्यांना वाटतो. कारण त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात ऊस दराच्या मागणीसाठीच्या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. 

त्यांनी कितीही जोर लावला असला तरी विजयसिंह मोहिते-पाटील यांना पराभूत करणे सोपे नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य आणि स्वत:ची भक्कम यंत्रणा या दोन जोरावर ते उभे आहेत आणि त्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यांच्याविषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही नेत्यांच्या मनात अंतर्गत कलहाची भावना आहे, पण तिचा निवडणुकीवर फार परिणाम होण्याची शक्यता नाही.  २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मोहिते-पाटलांचा १९८० पासून लढवून जिंकलेला माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाला. त्यामुळे मोहिते-पाटलांना आपला मतदारसंघ सोडून पंढरपूर मतदारसंघात जावे लागले आणि तिथे त्यांचा ४० हजार मतांनी पराभव झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले मोहिते-पाटील असे पराभूत झाले ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने नामुष्कीची ठरली. पण या पराभवानंतर मोहिते-पाटलांनी कोणाचाही सूड घेतला नाही. परिपक्वपणाचे दर्शन घडविणारी शांतता त्यांनी पाळली. त्यामुळे त्यांच्याविषयी या मतदारसंघात एक गुडविल निर्माण झाले आहे आणि ते त्यांना विजय मिळवून देण्यास उपयोगी पडणार आहे. २००९ साली त्यांच्याविषयी जी द्वेषाची भावना होती ती आता राहिलेली नाही. 

असे सारे पारडे जड होत असतानाच त्यांच्या मार्गात भाऊबंदकीची धोंड उभी राहिली आहे. त्यांचे कनिष्ठ बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील हे त्यांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत. सार्‍या गोष्टी चांगल्या असताना विजयसिंह मोहिते-पाटलांना घरातूनच अडचण निर्माण झाली आहे. प्रतापसिंह मोहिते-पाटील हे महत्वाकांक्षी आहेत. पण मुरब्बी नाहीत. ते मध्यंतरी भाजपात होते. भाजपाने त्यांना विधानपरिषद सदस्य केले, सहकार राज्यमंत्री केले आणि २००३ साली पोटनिवडणुकीत खासदार म्हणून निवडून सुद्धा आणले. मात्र ते अचानकपणे कॉंग्रेसमध्ये गेले आणि तिथून आता बाहेर पडून अपक्ष म्हणून आपल्याच बंधूंंच्या विरोधात उभे राहिले आहेत. त्यांची जनसेवा नावाची संघटना आहे. तिच्या माध्यमातून ते मोठे आव्हान उभे करू शकतात. ते निवडून येणार नाहीत, पण आपल्या मोठ्या भावाला पाडण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्या ताकदीला अजित पवार यांची फूस आहे. तशी ती नसती तर विजयसिंह मोहिते-पाटलांना आपल्या भावाची फार चिंता करण्याची गरज नव्हती. पण आता ती निर्माण झाली आहे. या मतदारसंघात आम आदमी पार्टीच्या उमेदवार म्हणून करमाळ्याच्या छात्रवाहिनीच्या कार्यकर्त्या ऍड. सविता शिंदे उभ्या आहेत. त्यांचा फारसा प्रभाव पडणार नाही. मात्र शरद पवारांचा मतदारसंघ आणि मोहिते-पाटलांच्या घरातली भाऊबंदकी यामुळे सोलापूर जिल्ह्यातला हा मतदारसंघ सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave a Comment