सोमैय्या विरोधात फौजदारी दाखल करणार भुजबळ

पुणे – राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपचे किरीट सोमैय्या यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे जाहीर केले असून सोमय्या यांनी भुजबळ आणि कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून जी मानहानी केली आहे, त्याबद्दल ४८ तासात माफी मागितली नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे भुजबळ यांचे म्हणणे आहे.

छगन भुजबळ यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे बांधकाम तसेच मुंबईतील एसआरए मध्ये कोट्यावधी रूपयांची माया खोटे हिशोब देऊन जमविली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्याबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले की ही सर्व कामे नियम पाळूनच केली गेली आहेत. आमच्यावर असले आरोप करून सोमय्या यांनी आमची मानहानी केली आहे. त्यांनी पुरावे द्यावेत अन्यथा माफी मागावी. सोमय्या यांच्याविरोधात दिवाणी न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा दावा लावणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.