न्यायालय हा अडथळा

राहुल गांधी हे नरेन्द्र मोदी यांच्यावर हिटलर असल्याचा आरोप केला आहे पण हिटलर ही पदवी या देशात कोणाला छान शोभत असेल तर ती केवळ इंदिरा गांधींना हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी आणीबाणी तर लादलीच पण न्यायालये आपल्या ऐकण्यात असली पाहिजेत असा आग्रह धरला होता आणि आपल्या आवडत्या न्यायाधीशाला मुख्य न्यायाधीश केले होते. सध्या परराष्ट मंत्री सलमान खुर्शीद न्यायालय आणि निवडणूक आयोगावर घसरले आहेत. नरेन्द्र मोदी यांनी  कॉंग्रेसवर टीका करताना हा पक्ष सगळ्या व्यवस्थांना नाकारणारा पक्ष असल्याचे म्हटले आहेे. त्याचे प्रत्यंतर लगेच आले. कॉंग्रेसवाल्यांना यंत्रणा हव्या असतात पण त्या त्यांच्या दिमतीला असतील तर हव्या असतात. त्या कॉंग्रेसलाच वेसन घालायला लागल्या तर मात्र त्यांचे पित्त खवळते. सलमान खुर्शीद यांना न्यायालयाच्या एका निकालाने तुरुंगात चक्की पिसायला जाण्याची भीती वाटत आहे तर निवडणूक आयोगाने त्यांना एकदा छानपैकी झापले आहे. या दोन यंत्रणांमुळे निवडणुकीच्या काळात वाटेल तशी मनमानी करता येत नाही आणि खोट्यानाट्या गोष्टी रेटून करून सत्तेला  गाठ घालणे शक्य होत नाही ही त्यांची खरी अडचण आहे. ती केवळ सलमान खुर्शीद यांचीच अडचण आहे असे नाही. तर सगळ्याच कॉंग्रेसवाल्यांची अडचण आहे. 

त्यांना खोटी आश्‍वासने देऊन जनतेला भुलवण्याची सवय झाली आहे. आजवर त्यांनी आपली सारी कारकिर्द आश्‍वासनांच्या आधारावर पार पाडलेली आहे. आता मात्र न्यायालयांचे काही निर्णय आणि निवडणूक आयोगाचे निर्बंध त्यांना अडथळ्यासारखे भासायला लागले आहेत. म्हणून त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर या दोन यंत्रणांना लक्ष्य केले आहे.  खरे म्हणजे निवडणुकीचा प्रचार अजून भरात आलेला नाही. पण सलमान खुर्शीद यांना अवघडल्यासारखे झाले आहे. त्यांचे हे अवघडलेपण आत्ताच्या निवडणुकीमुळे निर्माण झालेले नाही तर ते उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपासून निर्माण झालेले आहे. त्या निवडणुकीत त्यांनी मुस्लीम समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून सत्ता मिळवण्याचा खटाटोप केला. मुस्लिम समाज या असल्या फसव्या लोकांच्या आश्‍वासनांना कंटाळला आहे. या समाजातल्या तरुणांनी सलमान खुर्शिद यांना केवळ आश्‍वासनांवर मते मिळणार नाहीत असे खडसावले. आरक्षणाचा सरकारी आदेश काढलेला कागद दाखवा आणि मगच मते मागा असे बजावले. खुर्शिद काय की अन्य कोणी कॉंग्रेसचे नेते काय त्यांना मुस्लिमांना आरक्षण देण्याची इच्छाच नाही. 

त्यांना केवळ हूल उठवायची आहे. तेव्हा आदेश दाखवणे शक्य नव्हते. पण खुर्शीद यांनी तसा आदेश काढण्याची कल्पना काढली. नंतर त्या आदेशाला  कोणी हरकत घेईल आणि तो आदेश बेकायदा ठरेल. पण, तूर्तास आपण तो आदेश दाखवून मते तर घेऊ शकतो की नाही? मग आदेश काढायला काय हरकत आहे ? असा विचार त्यांनी कॉंग्रेस नेत्यांच्या गळी उतरवला पण आचार संहितेच्या काळात असा सरकारी आदेश काढता येत नाही. म्हणून निवडणूक आयोगाने त्यांना ताकीद दिली. तेव्हापासून  खुर्शीद निवडणूक आयोगावर खप्पा आहेत. मुस्लिम समाजाला फसवण्याचा आपला प्रयत्न आयोगाने हाणून पाडला याची चीड त्यांना आहे. ते म्हणतात, निवडणूक आयोग म्हणजे एक माणूस आहे. एक माणूस सार्‍या निवडणुकीचे भवितव्य कसे घडवू शकतो ? असा त्यांचा सवाल आहे. त्यांचा हा युक्तिवाद अगदीच मूर्खपणाचा आहे कारण आयुक्त हा एक माणूस असला तरीही तो ज्या कायद्याची अंमलबजावणी करीत आहे तो कायदा सलमान खुर्शीद यांच्या आजोबांसह अनेक जाणकार लोकांनी तयार केलेला आहे.  उत्तर प्रदेशातले कॉंग्रेसचे नेते जगदंबिका पाल यांनी कॉंग्रेसचा त्याग केला आणि पक्ष सोडताना सलमान खुर्शीद यांच्या अध्यक्षतेखालील झाकीर हुसेन ट्रस्टमध्ये किती भ्रष्टाचार चालतो याची यादीच पत्रकारांना दिली. 

आता या प्रकरणाचा भंडाफोड होणार आणि कदाचित त्यात आपल्याला शिक्षा होणार असा संशय त्यांना आला आहे आणि त्यांनी न्यायालयावरही दुगाण्या झाडायला सुरूवात केली आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या दोन कायद्यांनी त्यांची झोप उडाली आहे. आजवर त्यांना न्यायालयांची भीती नव्हती. कारण भ्रष्टाचार केला तरीही लगेच काही निकाल लागत नव्हता. कोणी कारवाई केलीच तर, चौकशी होऊन जाऊ द्या म्हणून आव्हान देता येत होते. असे आव्हान फुसके असायचे कारण चौकशी केलीच तर ती वर्षानुवर्षे चालत असे आणि दरम्यान मान वर करून  साळसुदपणाने चालता येत असे. आता या विलंबाचा फायदा घेऊन सलमान खुर्शीद हे चक्क परराष्ट्रपद भूषवित आहेत.  आता ही संधी मिळणार नाही कारण न्यायालयाने एका निर्णयात अशा भ्रष्ट नेत्यांचे खटले एका वर्षात निकाली काढावेत असा आदेश दिला आहे तर या आधीच्या एका निकालाने खालच्या कोर्टात निकाल लागताच आधी आमदार किंवा खासदारपद जाईल असे बजावले आहे. त्यांना या निर्णयावर अपील दाखल करता येईल पण दरम्यान पद सोडावेच लागेल असे न्यायालयलाने म्हटले आहे. चोर्‍या करून आणि न्यायालयाच्या विलंबाच्या आड दडून सभ्यपणाचा बुरखा पांघरण्यास चटावलेले असे नेते आता घाबरले आहेत. आता सलमान खुर्शीद यांना आजोबांच्या नावाने काढलेल्या ट्रस्टमधील भ्रष्टाचारापोटी शिक्षाही होऊ शकते आणि खासदारपदही गमवावे लागते

Leave a Comment