मुंबई ः नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्यात मनसेला महायुतीत आणण्यासंबंधी झालेली चर्चा फोल ठरल्याच्या चार-पाच दिवसानंतरच राज ठाकरे यांनी मनसेचे उमेदवार स्वतंत्रपणे उभे राहतील अशी घोषणा केली आणि आपल्या पक्षाचे लोकसभा निवडणुकीतले सात उमेदवारही जाहीर केले. त्यांनी ही घोषणा आपल्या पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना केली.
आपण स्वतंत्रपणे उमेदवार उभे करत असलो तरी आपल्या पक्षाचे निवडून येणारे खासदार पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देतील अशी घोषणा त्यांनी केली. एवढेच नव्हे तर मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी प्रयत्नही करतील असे राज ठाकरे म्हणाले.
श्री. नरेंद्र मोदी यांची मुंबईत सभा झाली तेव्हा त्यांनी आपल्या भाषणामध्ये कै. बाळासाहेब ठाकरे यांचे नावसुध्दा घेतले नाही. त्यावरून राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. मात्र आता राज ठाकरे त्यांच्या बाजूला उभे राहत आहेत.
२००९ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १२ उमेदवार उभे केले होते. त्यातले बहुसंख्य उमेदवार मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या भागातले होते आणि त्यांनी जवळजवळ सगळ्या मतदार संघांमध्ये एक लाखापेक्षा अधिक मते घेतली होती. परिणामी भाजपा सेना युतीचे काही मतदार पडलेही होते. नंतरच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने १३ जागा जिंकल्या होत्या.
मनसेने काल खालील उमेदवार जाहीर केले. दक्षिण मुंबई – बाळा नांदगावकर, दक्षिण मध्य मुंबई – आदित्य शिरोडकर, उत्तर पश्चिम मुंबई – महेश मांजरेकर, कल्याण डोंबिवली – राजू पाटील, शिरुर -अशोक खंडेभराड, नाशिक – डॉ. प्रदीप पवार आणि पुणे – दीपक पायगुडे.