रामदास कदम यांची मनसे भेट

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मनसेवर आगपाखड सुरु असताना, मनसे मात्र शांत राहून शिवसेनेचा एक एक नाराज मोहोरा आपल्या गळाला लावत आहे. भारतीय विद्यार्थी सेना आणि शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे माजी अध्यक्ष अभिजीत पानसे यांना मनसेमध्ये आणल्यानंतर शिवसेनेच दुसरे वरिष्ठ नेते रामदास कदम हे ही मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

रामदास कदम यांनी मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही कौटुंबिक भेट असल्याचे वैभव खेडेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र येत्या काही दिवसात कोकणातील शिवसेनेच्या अंतर्गत राजकरणात मोठी उलथा-पालथ होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. रामदास कदम गेल्या काही काळापासून शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा आहे.

रामदास कदम यांच्यासारखा वरिष्ठ नेत्यांने शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली तर, तो सेना नेतृत्वाला एक झटका असेल. आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपशी मैत्रीचे नाते जपून शिवसेनेला झटका देण्याची मनसेची रणनिती आहे. त्यादृष्टीने मनसे मुंबई, ठाणे, कल्याण आणि नाशिकमध्ये शिवसेना उमदेवारांच्या विरोधात तगडे उमेदवार देणार आहे.

Leave a Comment