चेन्नई- जर्मन व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी डेमलर चेन्नईजवळ बस तयार करण्याचा कारखाना उभारत असून त्यासाठी ४२५ कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे.२०१५ च्या दुसर्यास सहामाहीपासून बस उत्पादन सुरू होईल असे डेमलरचे बोर्ड सदस्य डॉ.वूल्फगाँग यांनी या प्रकल्पाच्या कोनशिला समारंभाच्यावेळी सांगितले.
वुल्फगाँग म्हणाले की यापूर्वीच आम्ही ४४०० कोटींची गुंतवणूक करून ट्रक उत्पादनाची सुविधा सुरू केली आहे. या प्रकल्पातून स्थानिक बाजारपेठेसाठी भारत बेंझ नावाने ट्रक उत्पादन सुरू आहे तर निर्यातीसाठी फुसो (एफयुएसओ) नावाने ट्रक उत्पादन केले जात आहे. याच प्रकल्पात आता बस उत्पादनही सुरू केले जाणार आहे. त्यात शालेय विद्यार्थी आणि स्टाफ यांच्यासाठी भारत बेंझ ब्रँडने बस उत्पादन होणार आहे. लक्झरी बसचे उत्पादन मर्सिडीज बेंझ नावाने केले जाणार आहे.
सध्या व्यावसायिक वाहनांसाठी चीन नंबर एकची बाजारपेठ आहे तर भारत दुसर्या नंबरवर आहे. मात्र भारताचा विकास दर भविष्यातही चांगला राहणार असल्याचा आमचा विश्वास आहे. या प्रकल्पातून सुरवातीला १५०० बसेस तयार केल्या जातील व नंतर हे प्रमाण ४ हजार बसेस वर नेले जाणार आहे असेही त्यांनी सांगितले.