कानात घालायच्या रिंग किवा बालीच्या आकाराचा संगणक जपानमधील हिरोशिमा विद्यापीठातील संशोधकांनी तयार केला आहे. हा संगणक युजरच्या डोळे आणि जिभेच्या इशार्यावर चालविता येणार आहे. इयरक्लिप वेअरेबल पीसी असे त्याचे सध्या नामकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संगणकाला ब्ल्यू टूथ, जीपीएस, कंपास, सेन्सर, बॅटरी, बॅरोमीटर, स्पीकर आणि मायक्रोफोन या सुविधाही दिल्या गेल्या आहेत.
हा संगणक बनविणारे प्रो.काजुहिरो तनिगुची म्हणाले की या संगणात नवीन सॉफटवेअर डाऊनलोड करण्याचीही सुविधा आहे तसेच डेटा स्टोरेजचीही सुविधा आहे. हा कोणत्याही स्मार्टफोन, आयपॉड वा अन्य इलेक्टीकल उपकरणांशी जोडता येणार आहे. केवळ भुवई उडविणे, नाक हलविणे, दांत ओठावर दाबणे, डोळे हलविणे अशा कृतीतूनही संगणक चालविता येणार आहे. कानात होत असलेल्या अगदी सूक्ष्म संवेदना हा संगणक ग्रहण करू शकणार असल्याने ज्यांना कमी ऐकू येते त्यांच्यासाठी हा संगणक श्रवणयंत्राचेही काम करेल तसेच शरीराचे तापमान आणि नाडीचा वेग यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होणार आहे.