काबूल- अफगाणिस्तानचे ५७ वर्षीय राष्ट्रपती हमीद करझाई यांच्या पत्नी जीनत कुरेशी यांनी गुडगांव येथील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मंगळवारी सकाळी मुलीला जन्म दिला असल्याचे समजते. करझाई यांचे हे तिसरे अपत्य आहे. करझाई यांची पत्नी आणि मुलगी दोघींचीही तब्येत उत्तम असून त्यांना लवकरच रूग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे.
अफगाणिस्तानच्या राजदूत शाईदा मोहम्मद अब्दाली यांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानच्या फर्स्ट लेडी जीनत त्यांच्या नातेवाईकांबरोबर कांही दिवसांपूर्वीच हरियानात आल्या होत्या. त्या बाळंतपणासाठीच येथे आल्या आहेत. करझाई यांनीही मुलीच्या जन्मानंतर अगदी थोडा वेळ पत्नी व नवजात अपत्याबरोबर घालविला आणि नंतर ते कोलंबोला रवाना झाले. करझाई यांच्या पहिल्या दोन अपत्यांचा जन्म अफगाणिस्तानातच झाला आहे. मात्र यावेळी तेथील डॉक्टरांनी तिसरे बाळंतपण अधिक चांगल्या सुविधांसाठी भारतात करण्याचा सल्ला करझाई यांना दिला होता व त्यानुसार तिसरे अपत्य भारतात जन्मले आहे.
करझाई यांनी रूग्णालयात पुरविल्या गेलेल्या उत्तम सुविधा आणि भारत सरकारने केलेले सहकार्य यासाठी आभार मानले आहेत असेही त्या म्हणाल्या.