लंडन – ग्रेट अरमंड स्ट्रीट रूग्णालयातील डॉक्टर संशोधकांनी मानवी फॅटमधून काढलेल्या स्टेमसेल किवा मूळ पेशींपासून पूर्ण चेहरा विकसित करण्याचा प्रयोग हाती घेतला असून सध्या या पेशींपासून कार्टिलेज म्हणजेच मऊ हाडे बनविण्यात त्यांना यश आले आहे. यामुळे कान किवा नाक असे अवयव प्रयोगशाळेत तयार करणे शक्य होणार आहे. तसेच कान नाकाच्या उपचारांतही या यशामुळे क्रांती घडून येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नॅनो मेडिसिन या मासिकात या संदर्भातला लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.
ज्या मुलांचा बाहेरचा कान पूर्णपणे विकसित झालेला नसतो त्या मायक्रोटिया नावाने परिचित असलेल्या व्याधीत आत्तापर्यंत बरगड्यातील कार्टिलेज काढून घेऊन त्याचे कानाच्या जागी प्रत्यारोपण केले जात होते. ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची आहे शिवाय बरगड्यातून काढलेले कार्टिलेज पुन्हा भरून येऊ शकत नाही. नवीन संशोधनामुळे आता कानाच्या किवा नाकाच्या आकाराचा साचा स्टेमपेशींच्या रसायनात बुडवून ठेवला तर पेशी तो आकार घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रयोगशाळेत तयार केलेला हा कान अथवा नाक त्वचेखाली प्रत्यारोपित करता येणार आहे.
अर्थात असे प्रत्यारोपण करताना त्याचे अन्य दुष्परिणाम होत नाहीत ना यासाठी अधिक संशोधन करण्याची गरज संशोधक पॅट्रीया फेरेटी यांनी व्यक्त केली आहे.सुरक्षेची पूर्ण खात्री करून घेतल्यानंतरच अशा शस्त्रक्रिया नियमित स्वरूपात सुरू केल्या जातील असे त्यांनी सांगितले.