कुंभलगड – भारतातील सर्वाधिक लांबीची भिंत असलेला गड

जगात सर्वाधिक लांबीची भिंत असलेला देश म्हणून चीन प्रसिद्ध असून येथील ग्रेट वॉल ऑफ चायना जगातील सात आश्वर्यात गणली जाते. जगातील दोन नंबरची लांब भिंत मात्र भारतात असल्याचे अनेकांना माहित नसेल. राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यात असलेल्या कुंभलगड कडे हा मान आहे. महाराणा कुंभाने बांधलेल्या या गडाचे बांधकाम तब्बल १५ वर्षे सुरू होते आणि त्याची सम्रुद्रसपाटीपासून उंची आहे ११०० मीटर. या गडाच्या भिंतीची लांबी आहे ३६ किलोमीटर.
kumbhalgarh
या गडाचा इतिहास मोठाच मनोरंजक आहे. किल्ला बांधताना पहाड, दर्‍या तसेच सपाटीचा मोठा कल्पकतेने उपयोग करून घेतला आहे. असे सांगितले जाते की सम्राट अशोकाच्या दुसर्‍या मुलाने येथे बांधलेला किल्ला भग्नावस्थेत होता त्यावरच या गडाचे बांधकाम केले गेले आहे. १४४३ साली राणा कुंभाने या गडाचे बांधकाम हाती घेतले खरे पण बांधकाम पुरेच होईना. तेव्हा राजाने एका साधूला पाचारण केले. साधू म्हणाला, नरबळी दिल्याशिवाय बांधकाम पूर्ण होणार नाही. राजा निराश झाला. बळी कोणाचा देणार? तेव्हा साधूने त्याचाच बळी देण्यास राजाला सांगितले.
kumbhalgarh1
साधू म्हणाला , मी चालत जातो, जेथे थांबेन तेथे माझा शिरच्छेद कर आणि त्या जागी देवीचे मंदिर बांध. साधू चालायला लागला आणि ३६ किलोमीटर चालत गेला. तेथे साधू थांबताच त्याचे शिर उडविले गेले. जेथे शिर पडले तेथे मंदिराचे पहिले महाद्वार बांधले गेले आणि जेथे धड पडले तेथे दुसरे महाद्वार बांधले गेले. त्यामुळे या गडाची भिंत ३६ किमी लांबीची आणि १५ फूट रूंदीची आहे.

kumbhalgarh2

(फोटो सौजन्य – MisterBharat)
विशेष म्हणजे या गडावर ३६० हून अधिक मंदिरे असून त्यातील ३०० प्राचीन जैन मंदिरे आहेत व बाकीची हिंदू मंदिरे आहेत. राणा पृथ्वीराज आणि महाराणा संग यांचे बालपण या किल्ल्यावर गेले असल्याचे इतिहास सांगतो. पहाडावरच्या उंच जागांवर निवासी इमारती, मंदिरे बांधली गेली आहेत तर सपाट भूमीचा उपयोग शेतीसाठी केला जात असे. खोल दर्‍या किंवा खोलगट जागांचा वापर जलाशयांसाठी केला गेला आहे. या गडाला एकदातरी आवर्जून भेट द्यायला हवी. राजस्थानातील उदयपूर, चितोडगडपासून कुंभलगड जवळ आहे. टॅक्सी अथवा खासगी वाहनांनी येथे जाता येते.

Leave a Comment