निवडणूका जाहीर; राज्यात १०, १७ व २४ रोजी मतदान

नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणूका बुधवारी जाहीर झाल्या असून देशभरात ९ टप़्प्यात मतदान होणार आहे. सोळाव्या लोकसभेसाठी ७ एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होत आहे. १२ मे पर्यंत मतदानाची प्रक्रिया होत असून, १६ मे रोजी निकाल लागेल. महाराष्ट्रात तीन टप्प़्यात म्हणजे १०, १७ व २४ रोजी मतदान होणार आहे. आजपासून सर्वत्र आचारसंहिता लागू झाल्याचे, मुख्य निवडणूक आयुक्त व्ही एस संपत यांनी सांगितले.

या निवडणुकांच्या तारखा ठरवताना परीक्षा, हवामान यांचा विचार केल्याचं संपत यांनी नमूद केले. ३१ मेपर्यंत १६ व्या लोकसभेसाठी निवडणुकीची प्रकिया पूर्ण होणे आवश्यक आहे. यंदा ८१ कोटी ४० लाख मतदार लोकसभेसाठी मतदान करतील. २००९ च्या तुलनेत मतदारांच्या संख्येत १० कोटी मतदार वाढले, अशी माहिती संपत यांनी दिली. मतदानासाठी ९ लाख 30 हजार मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे. तसंच मतदार यादीत नाव नसलेल्यांसाठी ९ मार्चपर्यंत संधी असल्याचंही संपत यांनी स्पष्ट केले.यंदा निवडणूक यंत्रावर ‘नोटा’ म्हणजे उमेदवार नाकारण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

महाराष्ट्रात १०, १७ आणि २४ एप्रिलला तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात १० एप्रिलला बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली-चिमूर या ठिकाणी मतदान होईल. दुसऱया टप्प्यात १७ एप्रिलला हिंगोली, नांदेड, परभणी, मावळ, पुणे, बारामती, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले, कोल्हापूर, माढा या मतदारसंघात मतदान होणार आहे. तिस-या टप्प्यात २४ एप्रिलला मुंबईतील सर्व मतदारसंघांबरोबरच नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, औरंगाबाद, दिंडोरी, पालघर, कल्याण, रायगड, नाशिक, भिवंडी, जालना या मतदारसंघांमध्ये मतदान होईल.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा पहिल्यांदाच मतदारांना ‘वरीलपैकी कोणीही नाही’ (nota) हा पर्यायही उपलब्ध असणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच या पद्धतीने मतदारांना नवा पर्याय मिळणार आहे. त्याचबरोबर मतदान केल्यानंतर मतदारांना कागदी पोचही मतदानयंत्रातून मिळणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रावरील मतदारांचा विश्वास वाढण्यास मदत होणार आहे.

९ टप़्प्यात होणा-या मतदानाच्या तारखा व राज्य मतदारसंघ पुढीलप्रमाणे ७ एप्रिल – २ राज्ये, ६ मतदारसंघ, ९ एप्रिल – ५ राज्ये, ७ मतदारसंघ ,१० एप्रिल – १४ राज्ये, ९२ मतदारसंघ, १२ एप्रिल – ३ राज्ये, ५ मतदारसंघ १७ एप्रिल – १३ राज्ये, १२२ मतदारसंघ , २४ एप्रिल – १२ राज्ये, ११७ मतदारसंघ ३० एप्रिल – ९ राज्ये, ८९ मतदारसंघ ७ मे – ७ राज्ये, ६४ मतदारसंघ.

Leave a Comment