इंटरनॅशनल वुमन ऑफ द इयरने लक्ष्मीचा सन्मान

वॉशिंग्टन – अॅसिड हल्ल्याची बळी ठरलेली भारतातील लक्ष्मी हिला प्रतिष्ठेचा इंटरनॅशनल वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. लक्ष्मी बरोबरच जगाच्या विविध देशातील अन्य नऊ महिलांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला जातो.

लक्ष्मीवर ती १६ वर्षांची असताना एकतर्फी प्रेमातून अॅसिड हल्ला केला गेला होता. मात्र त्याने खचून न जाता अॅसिड विक्रीवर बंदी यावी यासाठी तिने चळवळ सुरू केली ,२७ हजार जणांच्या सह्या गोळा केल्या आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेऊन अशी बंदी आणण्यात यश मिळविले. अॅसिडने विदूप झालेल्या चेहर्‍याचा कोणताही बाऊ न करता तिने धैर्याने अनेक वेळा दूरदर्शनवर दर्शन दिले आणि मनाची खंबीरता दाखवून दिली. पुरस्कार स्वीकारताना तिने कविता म्हटली. त्याचा आशय असा, माझ्यावर अॅसिड फेकणार्‍यांनो ऐका, जो चेहरा तुम्ही विद्रूप केलात, त्याच्यावर मी अधिकच प्रेम करते. मी जिवंत आहे, मुक्त आहे आणि माझी स्वप्ने पुरी करते आहे. तुमच्या कृत्याने काळच तुमच्यावर ओझे बनून राहील.

मिशेल ओबामा या पुरस्कारांविषयी म्हणाल्या की जगभरातील धैर्यशाली महिलांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या महिलांनी अन्यायाविरोधात आवाज उठविला, धैर्याने पाऊल पुढे टाकले आणि समाजात बदल घडविण्यासाठी लढा दिला त्यांच्यापासून सर्वांनीच प्रेरणा घेतली पाहिजे. आपण हे ओळखले पाहिजे की आपल्या प्रत्येकात ही शक्ती आहे. त्याचा वापर केला पाहिजे.

Leave a Comment