संजय दत्तच्या रजेत वाढ

मुंबई – मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी असलेला आणि सध्या येरवड्याच्या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला चित्रपट अभिनेता संजय दत्त याने केलेला रजेची मुदत वाढविण्याचा अर्ज प्रशासनाने मान्य केला असून त्याची रजा एक महिन्याने वाढवली आहे. संजय दत्तने पत्नीची प्रकृती चांगली नसल्यामुळे रजा मागितलेली होती आणि तो सध्या रजेवर आहे. तिची प्रकृती अद्यापही चांगली नसल्यामुळे रजेत वाढ करावी अशी मागणी त्याने केली होती.

शिक्षा भोगत असलेल्या अशा कैद्यांना रजा देण्याच्या बाबतीत काही नियम आहेत आणि त्या नियमांच्या आधीन राहून त्याला ही रजा दिली गेलेली आहे. २०१४ या वर्षामध्ये त्याला भोगता येईल एवढी रजा आता संपणार आहे आणि पुन्हा त्याला या वर्षात कधीच रजा मिळू शकणार नाही. तो पहिल्या रजेची मुदत संपून २१ फेब्रुवारीला कारागृहात परत येणे अपेक्षित होते. मात्र आता तो २१ मार्चला परत येईल.

संजय दत्त २१ डिसेंबरपासून रजेवर होता. तत्पूर्वी त्याने २१ ऑक्टोबरला रजा घेतली होती आणि त्याला त्यावेळी दोन आठवड्याची रजा मंजूर झाली होती. परंतु त्याने तीही रजा १५ दिवसाने वाढवून घेतली होती. तो नोव्हेंबरमध्ये कारागृहात गेला आणि डिसेंबरमध्ये पुन्हा बाहेर आला आहे. त्याला ४२ महिन्यांची कैदेची शिक्षा भोगायची आहे.