आपचे झाले दोन काप

आम आदमी पार्टीने अजून वीसही उमेदवार जाहीर केलेले नाहीत परंतु त्यातून तीन ठिकाणी पक्षात बंडखोरी झाली आहे. आम आदमी पार्टीचे नेते उथळ आहेत. अशा उथळ नेत्यांना संघटना बांधता आणि टिकवता येत नसते. म्हणून नागपूरमध्ये अंजली दमानिया यांच्या उमेदवारीविरुध्द पक्षात बंडखोरी झालेली आहे. नवी पर्यायी राजकीय शैली उभी करण्याच्या घोषणा करणारे अरविंद केजरीवाल कॉंग्रेसचा पाठिंबा घ्यायचा की नाही यासाठी जनतेला विश्‍वासात घेत होते. खरे म्हणजे त्यांचे हे नाटकच होते. त्यांना जनतेची पर्वा नाही हे वास्तव आहे. म्हणूनच कोणालाही विश्‍वासात न घेता त्यांनी अंजली दमानिया यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. आता नागपूरमधले आम आदमीचे कार्यकर्ते बिथरले आहेत. दमानिया यांची उमेदवारी जाहीर करताना सामान्य माणूस सोडूनच द्या पण पक्षासाठी अविश्रांत काम करणार्‍या कार्यकर्त्यांनासुध्दा विश्‍वासात घेतलेले नाही. त्यामुळे आता तर वीस उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यातल्या तीन मतदारसंघात पक्षात फूट पडली आहे. मुळात विजय पांढरे, सुभाष वारे असे सामान्य माणसाला माहीत नसलेले उमेदवारच जाहीर करण्यात आल्यामुळे त्यांची फारशी कोणी दखल घेतलेली नाही. पण जिथे तशी दखल घेतली जाते तिथे पक्ष फुटायला लागला आहे. पक्ष बांधणे हे किती अवघड काम असते हे केजरीवाल यांना आता लक्षात यायला लागेल.

हा पक्ष सध्या चर्चेचा विषय झाला आहे. चर्चेचा विषय होणे म्हणजे फार मोठे यश नव्हे. माध्यमांना हाताळण्याची युक्ती माहीत असली आणि नाटके करण्याचे कसब अंगी असले की आपल्या पक्षाला चर्चेचा विषय करणे शक्य होते. परंतु असे चर्चेचा विषय झालेले पक्ष संघटनात्मकदृष्ट्या सक्षम असतातच असे नाही आणि संघटना बांधण्याची क्षमता नसली की पक्ष छोटाच पण गट मात्र अनेक अशी अवस्था होते. आम आदमी पार्टी अजून रांगायलासुध्दा लागलेली नाही परंतु नागपूरमध्ये या पक्षात फूट पडली असून नागपूर आम आदमी पार्टी नावाचा नवा पक्ष स्थापन झाला आहे. या पक्षाने आणलेला आव फार तर काही महिने टिकेल अशी सारी चिन्हे दिसत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदापासून पळच काढलेला आहे. प्रशासन चालविण्याच्या प्रक्रियेत जो किचकट पणा असतो तो त्यांना हाताळता आलेला नाही. म्हणून त्यांनी चक्क मुख्यमंत्रीपद सोडून दिलेले आहे. परंतु ते सोडताना आपण पळ काढलेला नसून त्याग करत आहोत आणि तोही भ्रष्टाचारसाठी त्याग करत आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तसे भासवून आपण पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरून नरेंद्र मोदींचा प्रभाव कमी करू अशी त्यांची कल्पना आहे.

अरविंद केजरीवाल यांनी ४९ दिवस सत्तेवर राहून आपण या पदाला योग्य नाही हे सिध्द करून दिले आणि नंतर त्यांनी हे पद सोडून दिले आहे. काल त्यांची देशातल्या उद्योगपतींसमोर जी मुलाखत झाली तिच्यात त्यांनी जे काही सांगितले त्यात तरी क्रांतीकारक असे काही नव्हते. देशाच्या विकासात उद्योगपतींची भूमिका महत्त्वाची असतेच. त्यांनी तसेच म्हटले आहे. मात्र आपण उद्योगपतींच्या आहारी जाण्याच्या आणि त्यांच्याशी संगनमत करण्याच्या विरोधात आहोत असे प्रतिपादन केले. देशातल्या कोणत्याही पक्षाने या पेक्षा वेगळी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा निर्माण करणारी ही मुलाखत फारसे काही न घडताच संपलेली आहे. अन्य राजकीय पक्षांमध्ये आणि आम आदमी पार्टीमध्ये फार काही फरक नाही हे वरचेवर दिसून यायला लागले आहे. आम आदमी पार्टीला स्थापन होऊन वर्षसुध्दा झालेले नाही आणि त्यांना अजून तरी सत्तेचा स्पर्श दिल्लीशिवाय इतरत्र कोठेही झालेला नाही. त्यामुळे सत्तेसाठी संघर्ष होण्याची शक्यता या पक्षात अजून तरी निर्माण झालेली नाही. परंतु मतभेद मात्र दिसायला लागले आहेत. प्रसिध्दीचा अतिहव्यास आणि अति उत्साहीपणा यांची बाधा या पक्षाला सर्वात जास्त झाली आहे आणि लोकसभेचे वीस उमेदवार जाहीर झाल्याबरोबर पक्षात फुटीची चिन्हे दिसायला लागली आहेत.

कोणत्या भ्रष्ट नेत्याच्या विरुध्द आपला स्वच्छ उमेदवार उभा राहणार आहे याची घोषणा त्यांनी केली. यातला अति उत्साहीपणा लोकांच्या लक्षात आला खरा परंतु त्यातली एक विसंगती कोणाच्याच ध्यानात आली नाही. देशातले भ्रष्ट नेते कोण याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांनीच करून टाकला आहे. न्यायाधीशावर असलेली ही जबाबदारी आपल्या डोक्यावर घेतलेली आहे आणि त्यातल्या त्यांच्या दृष्टीने भ्रष्ट असलेल्या नेत्यांच्या विरोधात त्यांनी एकेक उमेदवार जाहीर केला आहे. त्यांनी भ्रष्ट म्हणून जाहीर केलेल्या नेत्यांपैकी निम्म्या नेत्यांनी आपल्याला भ्रष्ट म्हटल्याबद्दल त्यांच्यावर खटले दाखल केले आहेत. परंतु आम्ही ज्यांना भ्रष्ट म्हणून त्यांना लोकांनीही भ्रष्टच म्हटले पाहिजे आणि त्यांचा पराभव म्हणजेच भ्रष्टाचार मुक्ती असेच समजले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. मात्र त्यांनी ज्या मातब्बर भ्रष्ट उमेदवारांच्या विरोधात आपले उमेदवार जाहीर केले आहेत ते भ्रष्ट उमेदवार त्या त्या मतदारसंघात उभे राहणारच असे आगावूच गृहित धरले आहे. चांदणी चौक मतदारसंघात कपिल सिब्बल यांच्या विरुध्द आशुतोष उभे राहणार अशी घोषणा आम आदमी पार्टीने केली आहे. मात्र त्या ठिकाणी कपिल सिब्बल यांची उमेदवारी अद्यापही जाहीर केलेली नाही. ती आम आदमी पार्टीनेच जाहीर केली आहे. गुडगावमधून मनीष तिवारी, नागपूरमधून नितीन गडकरी असे अन्य पक्षाचे वीस उमेदवार आम आदमी पार्टीनेच गृहित धरले आहेत. यातल्या त्यांचा उथळपणा लोकांना जाणवत असतो आणि अशा उथळ लोकांना संघटना बांधता आणि टिकवता येत नसते. म्हणून नागपूरमध्ये पक्ष फुटला आहे.

Leave a Comment