डॉ. शुभा राऊळ व शीतल म्हात्रे यांचे काय होणार

मुंबई- शिवसेनेच्या महिला नगरसेवक डॉ. शुभा राऊळ व शीतल म्हात्रे यांना न्याय देण्यात पक्षप्रमुख अपयशी ठरत आहे. तर दुसरीकडे मात्र, विभागप्रमुख विनोद घोसाळकर यांनी या दोघींना पक्षातूनच हद्दपार करण्याची तयारी चालवली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी एका वतपत्रात केलेल्या जाहिरातबाजीत घोसाळकरांनी या दोघींची नावे वगळून त्यांना अप्रत्यक्षपणे पक्षातूनच बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

काही दिवसांपासून महिला नगरसेवकावर अत्याचार करणा-या घोसाळकरांच्या कृष्णकृत्यावर ‘मातोश्री’ मात्र मूग गिळून आहे. त्यामुळे पक्षातून कोणाला काढायचे हे आता पक्षप्रमुखांऐवजी विभागप्रमुखच ठरवत असल्याची चर्चा यानिमत्ताने रंगली आहे. बाळासाहेबांच्या जयंतीदिनी व सामनाच्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या जाहिरातीत घोसाळकर यांनी त्यांच्या विभागातील नेते, उपनेते, नगरसेवक, नगरसेविका, उपविभागप्रमुख, महिला उपविभाग संघटक, शाखाप्रमुख, महिला शाखा संघटक, माजी नगरसेवक, कामगार संघटनांचे पदाधिकारी यांच्या नावांचा उल्लेख केला.

त्या च जाहीरातीत विभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका शीतल म्हात्रे व प्रभाग क्रमांक पाचच्या नगरसेविका डॉ. शुभा राऊळ यांची नावे यातून वगळण्यात आली आहेत. या दोघींना आमदार घोसाळकर आणि त्यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्याकडून अत्याचार आणि बदनामीला सामोरे जावे लागल्याचा आरोप झाला होता. मात्र, अद्यापही या प्रकरणी पक्षप्रमुखांनी मौनीबाबांची भूमिका घेतल्याने शिवसैनिकांत संभ्रमाचे वातावरण आहे.