हार्वर्डच्या अधिष्ठातापदी भारतीयाची नियुक्ती

न्यूयॉर्क – जागतिक ख्यातीच्या हार्वर्ड कॉलेजचे अधिष्ठाता म्हणून मूळ भारतीय वंशाच्या डॉ. राकेश खुराणा यांची निवड करण्यात आली आहे. हार्वर्ड कॉलेज हे जगातले प्रतिष्ठित महाविद्यालय आहे. जगातल्या विविध देशातील उच्चभ्रू समाजातील मुले आवर्जून या विद्यापीठात शिक्षण घेतात. अशा प्रतिष्ठित संस्थेच्या अधिष्ठाता पदावर प्रथमच एका भारतीयाची निवड झालेली आहे.

श्री. खुराणा आपल्या पदाची सूत्रे येत्या जुलैमध्ये हाती घेणार आहेत. ते सध्या हार्वर्डशी निगडित संस्थेमध्ये लिडरशीप डेव्हलपमेंट विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते एव्हेलिन हॅमंडस् यांच्या हातून या पदाची सूत्रे घेतील. अमेरिकेतल्या मान्यवर समजल्या जाणार्‍या एचबीएस या संस्थेने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविलेले आहे. त्यांचा अनुभव आणि कौशल्य यांचा लाभ हार्वर्ड कॉलेजला मिळेल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेचा मान वाढत राहील, असा विश्‍वास हार्वर्डच्या संचालकांनी त्यांची नियुक्ती जाहीर करताना व्यक्त केला आहे.