ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोईफोडे यांचे निधन

नांदेड – नांदेड येथून प्रसिद्ध होणार्‍या प्रजावाणी या दैनिकाचे संपादक सुधाकर डोईफोडे यांचे बुधवारी सकाळी हैदराबाद येथील खाजगी रुग्णालयात यकृताच्या विकाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. १९६२ साली त्यांनी प्रजावाणी हे साप्ताहिक सुरू केले आणि नंतर आपल्या मित्रांच्या सहकार्याने त्याचे दैनिकात रुपांतर केले. या दैनिकाचे संपादक म्हणून जबाबदारी पार पाडतानाच त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांत काम केले होते.

समाजवादी विचाराचे म्हणून समजले जाणारे श्री. डोईफोडे यांची लेखणी धारदार होती आणि त्यांच्या अग्रलेखांना अनेकदा पुरस्कार मिळालेले होते. मराठवाड्याचे विकास विषयक आणि विशेषत: रेल्वेविषयक प्रश्‍न अभ्यासपूर्ण पद्धतीने सरकारच्यासमोर मांडण्याबाबत त्यांची ख्याती होती आणि त्यांनी मराठवाड्याच्या रेल्वेचे अनेक प्रश्‍न सोडवलेले होते. १९६७ साली त्यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव तरोडेकर यांना पराभूत करून नगरपालिकेत प्रवेश केला होता.

त्यांच्या विविध क्षेत्रातील कामांची दखल घेऊन त्यांना नांदेड भूषण पुरस्कार देण्यात आला होता. त्याशिवाय रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले होते. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेऊन कारावास भोगला होता. १९७५ साली देशात लागू झालेल्या आणीबाणीच्या विरोधातही त्यांनी संघर्ष केला होता. त्यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.