बिहारमधील नवे समीकरण

लोकसभा निवडणुकीचे नगारे वाजत आहेत आणि कॉंग्रेस पक्ष पराभवाच्या गर्तेत सापडला आहे. असे म्हटले जात असले तरी कॉंग्रेसच्या नेत्यांनी कंबर कसायला सुरूवात केली आहे. तामिळनाडूमध्ये सध्या जयललिता यांचा जयजयकार होत असला तरी कॉंग्रेसने द्रमुक नेते करूणानिधी यांचा हात सोडायचा नाही असा निर्धार केलेला आहे. त्या दृष्टीने कॉंग्रेसचे सरचिटणीस गुलाबनबी आझाद यांनी करूणानिधीशी चर्चाही सुरू केलेली आहे. आंध्र प्रदेश हातातून गेला असल्याचे बोलले जात असले तरी तिथेही कॉंग्रेसने पुन्हा एकदा उचल खाण्याची तयारी सुरू केली आहे. देशातल्या मोठ्या राज्यांपैकी बिहारमध्ये कॉंग्रेसला अचानकपणे लॉटरी लागल्यागत चित्र निर्माण झाले आहे. तिथे भारतीय जनता पार्टी एकाकी लढत देणार आहे. परंतु कॉंग्रेसला मात्र योगायोगाने तीन मित्र मिळाले आहेत. रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने कॉंग्रेसबरोबर युती करण्याची घोषणासुध्दा केली आहे. लालूप्रसाद यादव तर कॉंग्रेसची इच्छा असो की नसो कॉंग्रेसबरोबर जाण्यास इच्छुक आहेत. भाजपा आणि जनता दल (यु) यांची युती तुटल्यामुळे जनता दल (यु)चे नेते मुख्यमंत्री नितीशकुमार हेही कॉंग्रेसशी मैत्री करण्यास उत्सुक अाहेत. अशारितीने बिहारमध्ये भाजपाच्या विरोधात सगळेच पक्ष एकत्र येत असून त्यात कॉंग्रेसचा समावेश झाला आहे.

भारताच्या राजकारणाचे चित्र युपी आणि बिहारवर ठरते. परंतु या दोन्ही राज्यात कॉंग्रेसला स्थान नाही. आता मात्र बिहारमध्ये कॉंग्रेसला जागा मिळाली आहे. लोकजनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान हे एकेकाळी प्रभावी नेते होते. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत ते अगदी तरुण होते आणि त्यांनी बिहारच्या आपल्या मतदारसंघातून विक्रमी मताधिक्क्याने विजय मिळवला होता. एकेकाळी बिहारच्या राजकारणात लालूप्रसाद यादव, नितीशकुमार आणि रामविलास पासवान हे एकत्र काम करत होते. परंतु जनता दलाला फुटीचा शापच आहे. हा पक्ष फुटल्यानंतर अन्य राज्यामध्ये अजितसिंग, मुलायमसिंग यादव, नवीन पटनायक, रामकृष्ण हेगडे, जॉर्ज फर्नांडिस आदि नेत्यांनी आपापल्या राज्यामध्ये आपले जनता दल पक्ष स्थापन केले. त्याच न्यायाने बिहारमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली नितीशकुमार यांनी समता पार्टी स्थापन केली, लालूप्रसाद यादव यांनी राष्ट्रीय जनता दल पक्ष काढला आणि रामविलास पासवान यांनी लोकजनशक्ती पार्टी स्थापन केली. या तिन्ही पक्षाचा बिहारच्या राजकारणात आपला असा एक प्रभाव आहे.

त्यामुळे हे तीन पक्ष राष्ट्रीय राजकारणासाठी कितीही लहान असले तरी बिहारच्या राजकारणात त्यांना उपेक्षित ठेवून काहीच करता येत नाही. आता हे तिन्ही पक्ष कॉंग्रेसच्या जवळ आले आहेत पण आता एक विचित्र अवस्था निर्माण झाली आहे. हे तिन्ही पक्ष अजूनही एकदिलाने कॉंग्रेसच्या मागे उभे राहण्याच्या मनःस्थितीत नाहीत. कारण तिघांचेही प्रवास विचित्र राहिलेले आहेत. रामविलास पासवान यांनी एनडीए मध्ये काही दिवस मंत्रिपद मिळवले, पण नंतर ते भाजपापासून दूर गेले. आता त्यांचा पक्ष कॉंग्रेसच्या जवळ सरकत आहे. नितीशकुमार यांनीही भाजपाशी असलेली १७ वर्षांची मैत्री तोडली आहे. तेव्हा त्यांनाही राष्ट्रीय राजकारणात काही तरी करण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाशी युती करणे अपरिहार्य आहे आणि तो राष्ट्रीय पक्ष म्हणजे कॉंग्रेस आहे. लालूप्रसाद यादव यांनी तर १९९९ पासूनच कॉंग्रेसशी मैत्री केलेली आहे आणि या मैत्रीतूनच त्यांनी २००४ ते २००९ या काळात रेल्वेमंत्रीपद मिळवून ते उपभोगले आहे. पासवान, लालूप्रसाद आणि नितीशकुमार या तिघांचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी केंद्रात ज्या ज्या पक्षांशी युती केली त्या पक्षांच्या सरकारमध्ये रेल्वेमंत्रीपद आग्रहाने मिळवलेले आहे.

आता रामविलास पासवान आणि लालूप्रसाद यादव यांची युती तुटलेली आहे. लालूप्रसादांनी कॉंग्रेसचा पदर सोडायचा नाही असे ठरवलेले आहे. म्हणून ते सातत्याने आणि जाहीरपणे ही गोष्ट वारंवार सांगत आहेत. कॉंग्रेसने रामविलास पासवान यांच्याशीही युती करण्याचे ठरवले आहे. दुसर्‍या बाजूला नितीशकुमार यांचीही ताकद कॉंग्रेसला निर्णायक वाटत आहे. म्हणून कॉंग्रेसमध्ये नितीशकुमार यांच्याशीही मैत्री करावी असा विचार व्यक्त होत आहे. जनता दलाचे तिन्हीही गट कॉंग्रेसच्या जवळ येत आहेत. परंतु एकाच म्यानात तीन तलवारी बसणार नाहीत. प्रश्‍न असा आहे की, तिन्ही तलवारी एकाच म्यानात बसत नसतील तर नेमक्या कोणत्या दोन तलवारी म्यानात ठेवाव्यात? रामविलास पासवान यांनी कॉंग्रेससमोर पर्याय ठेवलेला आहे. नितीशकुमार यांचा जनता दल (यु) हा पक्ष लालूप्रसाद यांच्या ठाम विरोधात आहे. त्यामुळे कॉंग्रेसने जनता दल (यु)शी युती केली तर त्या युतीमध्ये लालूंचा राजद पक्ष नसेल. रामविलास पासवान यांचीही इच्छा तशीच आहे. त्यांनी कॉंग्रेसकडे नितीशकुमार यांच्या जनता दल (यु) शी युती करण्याचा आग्रह धरला आहे. त्यातून लालूप्रसाद यांच्या राजदला बिहारमध्ये एकला चलो रे चे धोरण राबवावे लागणार असे दिसत आहे. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा याबाबत कानोसा घेतला तर ते कार्यकर्तेही लालूप्रसादपेक्षा नितीशकुमार बरे असाच कौल देतील.

Leave a Comment