पुणे- महिन्याभराच्या पॅरोलवर सुटका झालेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (५४) याच्या पॅरोलमध्ये आणखी एक महिन्याची वाढ करण्यात आली आहे. अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपी अभिनेता संजय दत्त येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. संजयने पत्नीच्या आजारपणामुळे पॅरोलमध्ये (संचित रजा) आणखी एक महिन्याची वाढ करण्यासाठी अर्ज केला होता. हा अर्ज सोमवारी विभागीय आयुक्तांनी मंजूर केला आहे.
मुदत संपण्याच्या एक दिवस आधीच त्याच्या पॅरोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०१३ मध्ये तो उपचारांसाठी २८ दिवसांच्या ह्यफर्लोह्ण रजेवर गेला होता. यानंतर त्याने पत्नी मान्यता हिच्या आजारपणाचे कारण सांगून आणखी रजा मिळण्यासाठी विनंती अर्ज केला होता. येरवडा कारागृह प्रशासन आणि मुंबई पोलिसांनी अहवाल दिल्यानंतर विभागीय आयुक्तांनी त्याला डिसेंबरमध्ये पॅरोल मंजूर केला होता. मात्र त्यावरुन उलट-सुलट चर्चा सुरु झाल्याने राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी पॅरोलच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यामुळे पॅरोल मंजूर होऊनही संजय दत्त तुरुंगातच होता.
अखेर २१ डिसेंबरला एक महिन्याच्या पॅरोलवर त्याची सुटका झाली. त्यावेळी तीन महिन्यात संजयला दुस-यांदा पॅरोल मंजूर झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यावेळी भाजपने संजयच्या पॅरोलवरील सुटकेला विरोध केला होता. नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनातही भाजपने संजय दत्तच्या सुटकेचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन शुक्रवारी संपल्यानंतर शनिवारी संजय दत्तची सुटका झाली.