खोबरेल तेल बहुगुणकारी

नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात आणि नारळाचा प्रत्येक भाग उपयुक्त असतो. नारळाचे पाणी, खोबरे, नारळाच्या शेंड्या यातले काहीही वाया जात नाही. विशेषत: खोबर्‍यापासून तयार होणारे तेल हे आपल्या जीवनाचा एक अंश होऊन बसलेले आहे. महाराष्ट्रात खोबरेल तेलाचा वापर थेटपणे खाण्यासाठी करत नाहीत. परंतु केरळामध्ये आणि कर्नाटकाच्या काही भागांमध्ये खोबरेल तेलाचा वापर स्वयंपाकासाठी सर्रास केला जातो. आपण मात्र खोबरेल तेल केसांसाठी वापरतो.

आपण त्याचा वापर स्वयंपाकात करत नसलो तरी नकळतपणे वनस्पती तुपातून खोबरेल तेल आपल्यापर्यंत येत असते. वनस्पती तुपात खोबरेल तेलाचा बराच अंंश असतो आणि खरे म्हणजे वनस्पती तूप काहीसे चवदार लागते, ते त्यातल्या खोबरेल तेलाच्या अंशामुळेच लागते. ते घट्ट असते आणि त्यामुळे ते खाण्यास अयोग्य आहे असे आपण मानतो. कारण जे तेल सामान्य तपमानाला विरघळत नाही ते तेल खाणे म्हणजे हृदयविकाराला निमंत्रण, असे आपण समजत असतो. परंतु वनस्पती तुपातले खोबरेल तेल त्यात हायड्रोजन गॅस पास केलेला असतो, म्हणून घट्ट झालेले असते. वस्तुत: शुद्ध स्वरुपातले खोबरेल तेल असे धोकादायक नसते कारण ते सामान्य तापमानाला विरघळत असते. एवढेच नाही तर ते अनेक प्रकारे उपयुक्त सुद्धा असते. आरोग्याला ते गुणकारी असते.

केरळ विद्यापीठामध्ये के.जी. नेवीन आणि टी. राजमोहन यांनी खोबरेल तेलामुळे आपल्या शरीरातील घातक कोलेस्टेरॉल नष्ट होते असे दाखवून दिले आहे. खोबरेल तेल आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांचे रक्षण करते. कारण त्याच्यामध्ये लॉरिक ऍसिड विपुलतेने उपलब्ध असते. खोबरेल तेलामध्ये काही घटक कर्करोग प्रतिबंधक आहेत. १९८७ मध्ये लिम सायलीयान्को या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालामध्ये खोबरेल तेलाच्या या गुणधर्माची चर्चा केलेली आहे. या तेलाविषयी आणखी बरेच संशोधन चाललेले आहे. ते सर्व संशोधन प्राथमिक स्तरावर असल्यामुळे त्यांचे निष्कर्ष अजून जाहीर झालेले नाहीत. परंतु ते उत्साहजनक असतील असे या संंशोधकांचे म्हणणे आहे. नारळाचे पाणी म्हणजे शहाळे हे किती गुणकारी असते हे तर काही सांगायची गरजच नाही. पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांनी युक्त असते. ते मूत्रमार्गातल्या संसर्गावर गुणकारी असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment