अमरावती : प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी आम आदमी पक्षासोबत युती करण्याची तयारी दर्शवली आहे. आम आदमी पक्षाचे नेते मयांक गांधी यांनी बच्चू कडूंना प्रहार संघटना आम आदमी पक्षात विलीन करण्याची ऑफर दिली होती. बच्चू कडू यांनी मयांक गांधी यांची विलिनीकरणाची ऑफर नाकारली. पण त्याच वेळी आगामी निवडणुकीत आम आदमी पक्षासोबत युती करण्यास तयारी दर्शवली.
अमरावतीत पत्रकारांशी बोलतांना बच्चू कडूंनी ही माहिती दिली आहे. त्यामुळं बच्चू कडू यांच्याशी आपची हातमिळवणी झाली तर विदर्भात आपची ताकद वाढण्याची शक्यता आहे. तर इकडे पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. मागील लोकसभा निवडणुकीत डी.एस.के. यांनी बहुजन समाज पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्यामुळं डी.एस. के. यंदा आम आदमी पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
डी.एस.कुलकर्णीचा प्रवेश आणि आमदार बच्चूचा होकार पाहता, आम आदमी पक्षानं महाराष्ट्रात हात-पाय पसरण्याची तयारी सुरु केल्याचं चित्र आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून छोट्या पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न आम आदमी पक्षाकडून होता आहे.