शरद पवार २४ तारखेला राज्यसभेसाठी अर्ज भरणार

मुंबई – शरद पवार येत्या २४ तारखेला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले. त्यामुळे राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय आज, मंगळवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. राज्यसभेतून डॉ. जनार्दन वाघमारे आणि वाय.पी. त्रिवेदी यांची मुदत संपुष्टात येत असून, त्या दोघांपैकी एका नेत्याला पुन्हा राज्यसभेत जाण्याची संधी मिळणे अशक्य असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले.

आजच्या बैठकीत लोकसभेच्या २२ जागांच्या उमेदवारांची नावेही नक्की करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. थोरले पवार राज्यसभेवर जात असल्यामुळे त्यांच्या माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे उपमुख्यमंत्री ​अजित पवार यांनी उमेदवारी करावी, असा आग्रह राष्ट्रवादीच्या हायकमांडचा आहे. पक्षाचे सर्वोच्च नेते यासंदर्भात जो काही निर्णय देतील तो आपल्यासकट सर्व ज्येष्ठ मंत्र्यांना लागू राहील असे सांगत अजित पवार यांनी लोकसभा उमेदवारीसाठी मनाची तयारी केली आहे.

दरम्यान, माढातून अजित पवार यांच्याशिवाय कृष्णा खोऱ्याचा पदभार असलेले जलसंपदा मंत्री शशिकांत ​शिंदे, माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचीही नावे ‌इच्छुकांमध्ये आहेत.

Leave a Comment