पंढरपूर- दोन दिवसापासून पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील बडवे आणि उत्पात यांचे हक्क संपल्यामुळे मंदिर समितीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. कोर्टाच्या आदेशाने आता मंदिरात बडवे आणि उत्पात यांना थांबता येणार नाही. त्याडमुळे आता मंदिर समितीचे कर्मचारी मंदिरात थांबत आहेत. शनिवारी पहिल्याच दिवशी विठ्ठलाच्या चरणी ठेवलेल्या दक्षिणापेटीत ८७ हजार तर रुक्मिणी मातेजवळच्या दक्षिणापेटीत २७ हजार इतके पैसे जमा झाले आहेत. पूर्वीच्या पद्धतीनुसार समितीला मिळणा-या उत्पन्नापेक्षा ही रक्कम जवळपास चौपट आहे.
पहाटे मंदिर उघडल्यापासून रात्री बंद करेपर्यंतच्या काळात कुठल्या बडवे आणि उत्पातांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी शेजारी उभे राहून देवाच्या पायाजवळ भाविकांकडून ठेवली जाणारी दक्षिणा गोळा करायची आणि त्यानंतर लिलाव करण्याची याठिकाणी वर्षानुवर्षे पद्धत होती. मात्र कोर्टाच्या आदेशाने आता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील बडवे आणि उत्पात यांचे हक्क संपल्यामुळे त्यांच्याऐवजी मंदिर समितीचे कर्मचारी मंदिरात थांबत आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी दररोज संध्याकाळी मंदिरात लिलाव होत असत. बडवे आणि उत्पात मंडळींनाच त्यात भाग घेता येत असे. आणि ही मंडळी गर्दीचे दिवस लक्षात घेऊन आपापसात मिळून ही लिलावाची रक्कम बोलत असत. मात्र सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर हा लिलाव बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता उत्पन्नात वाढ झाली आहे.