तिस-याच दिवशी महाराष्ट्राला विजयाची संधी

इंदूर- महाराष्ट्राने संग्राम अतीतकरच्या (१६८) शतकाच्या जोरावर ४५५ धावा फटकवत मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे सोमवारी तिस-याच दिवशी रणजी करंडकाची उपांत्य फेरीतील लढत जिंकण्याची संधी महाराष्ट्राकडे चालून आली आहे. हा सामना जिंकल्यानंतर महाराष्ट्राला रणजीच्या अंतिम फेरीत पोहचता येणार आहे.

इंदूर येथे सुरू असलेल्या उपात्य फेरीच्या सामन्यात बंगालच्या पहिल्या डावातील ११४ धावांना उत्तर देताना महाराष्ट्रााची सुरूवात दमदार झाली. दुस-या दिवशी ४ बाद १६४ धावांवरून महाराष्ट्राने खेळ सुरू केल्यावर कर्णधार रोहित मोतवानी (८) लगेच बाद झाला. मात्र अंकित बवणे (८९) आणि अतीतकर यांनी सहाव्या विकेटसाठी ११३ धावा जोडत महाराष्ट्राला मोठय़ा आघाडीकडे नेले. बवणेचे शतक हुकले मात्र अतीतकरने शेवटच्या फलंदाजांच्या साथीने फटकेबाजी केली. त्याचे हे रणजी हंगामातील पहिलेच शतक ठरले. नवव्या क्रमांकाचा फलंदाज अनुपम संक्लेचाने ५२ धावा फटकवत महाराष्ट्राच्या डाव पुढे नेला.

संग्राम अतीतकरच्या (१६८) शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने ४५५ धावा फटकवत मोठी आघाडी घेतली. त्याबदल्यात रविवारी खेळ थांबला तेव्हा बंगालची १ बाद १६ अशी स्थिती होती. डावाने पराभव टाळण्यासाठी अजून त्यांना ३२५ धावा गरजेचे आहेत. अजून सामन्याचे दोन दिवस उरले असल्याने त्यांचा पराभव अटळ आहे.

Leave a Comment