दिशाभूल करण्याची परंपरा

राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्याचे संकेत दोनच दिवसांपूर्वी दिले होते पण काल या मुद्यावर पक्षात मतभेद दिसून आले त्यामुळे आता त्यांना असा उमेदवार न ठेवता कॉंग्रेस पक्षाच्या प्रचार मोहिमेचा प्रमुख करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पक्षाचा एक सैनिक म्हणून ते लढणार आहेत. राहुल गांधी यांनी पक्षाचा साधा सैनिक म्हणून आपल्या पंतप्रधानांनाच आज्ञा द्यायला सुरूवात केली आहे. निवडणुकीच्या काळात अशा आज्ञा देऊन राहुल गांधी यांनी जनतेला काही तरी मिळवून दिले आहे असा भास निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. आजवर पंतप्रधानांनी जनतेला काही देण्यापासून हात आखडता घेतला होता आणि ते आता राहुल गांधी जनतेला मिळवून देत आहेत. अशा रितीने राहुल गांधी जनतेसाठी पंतप्रधानांशी भांडत आहेत असे चित्र निर्माण केले जात आहे. जनतेची फसवणूक करून त्यांची दिशाभूल करण्याची ही कॉंग्रेसची परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय काल कॉंग्रेस महासमितीच्या अधिवेशनात घेतला गेला आहे. लोकांना मूर्ख बनवण्याचा एक प्रकार म्हणजे गॅसच्या टाक्यांची मागणी. प्रत्यक कुटुंबाला वर्षाला १२ अनुदानित टाक्या दिल्या पाहिजेत अशी जोरदार मागणी त्यांनी केली. गंमत पहा. या टाक्या अमर्याद होत्या त्या ९ केल्या कोणी ? यांनीच. आता १२ टाक्या देऊन जनतेचे भले करण्याचा आव आणत आहेत. जनता काही बोळ्याने दूध पीत नाही.

मुळात गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्याची तयारी चालली होती. राहुल गांधी यांनी तसा संकेत देऊन नवीन जाकीट शिवून घेतले पण महासमितीच्या अधिवेशनात त्यांच्यावर कोणतीच जबाबदारी टाकण्यात आली नाही. पक्षाने त्यांना पूर्वीच उपाध्यक्ष केले होते. आता त्यांना कसलीही बढती दिली नाही कारण त्यांना वरचे पद दिल्याने कॉंग्रेसचा पराभव होण्याची शक्यता वाढत चालली आहे. राहुल गांधी उमेदवार म्हणून समोर आले तर त्यांची आणि नरेंद्र मोदी यांची तुलना होईल ही कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मनातली भीती मनातून जायला तयार नाही. ही वस्तुस्थिती मान्य करण्याऐवजी नाना तर्‍हेची तर्कदुष्ट विधाने करून असा उमेदवार जाहीर करण्याची गरजच कशी नाही हे पटवून देण्याचा व्यर्थ प्रयत्न आता राहुल गांधी करीत आहेत. पंतप्रधानाची निवड निवडून आलेले खासदार करत असतात. त्यामुळे आधीच उमेदवार जाहीर करणे हे घटनेला सोडून आहे, नरेंद्र मोदी यांची अशी उमेदवारी जाहीर करणे हे लोकशाहीशी विसंगत आणि हुकूमशाही प्रवृत्ती आहे असे भासवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

पण हा युक्तिवाद त्यांनी सुरूवातीपासून सातत्याना असाच केला असता तर निदान त्यांच्या युक्तिवादाला त्यांचाच पाठिंबा आहे की नाही अशी शंका आली नसती परंतु ही भूमिका सुरूवातीपासून अशी राहिलेली नाही. जेव्हा कॉंग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार इंदिरा गांधी यांच्यासारखा प्रभावी होता तेव्हा त्यांनी भावी पंतप्रधान म्हणून त्यांचा गवगवा केलेला आहे. १९७० साली मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा ‘इंदिरा गांधी आयी है नयी रोशनी लायी है’ अशा घोषणा देऊन त्यांनी इंदिरा गांधी याच पंतप्रधान होणार असे जाहीर केले होते. पंतप्रधानपदाचा उमेदवार आधी जाहीर करायचा नाही ही कॉंगे्रसची परंपरा नाही पण आज त्यांचा उमेदवार दुबळा असल्यामुळे ते नसलेल्या परंपरेच्या मागे दडत आहेत आणि तसे दडूनही आपणच घटनेनुसार वागत आहोत असे खोटे पण रेटून सांगत आहेत. पंतप्रधानाची निवड निवडून आलेले खासदार करत असतात हे तर शेंबड्या पोरालासुध्दा कळते. त्यामुळे घटना वाचण्याची गरज नाही. पण तुमच्या हाती सत्ता आल्यानंतर त्या पदासाठीचा तुमचा उमेदवार कोण असणार आहे हे आधी सांगितल्याने घटनेचा भंग होत नाही. भारताच्या राज्य घटनेनुसार पंतप्रधान हे कार्यकारी प्रमुख असतात आणि तेपंतप्रधान कोण असणार आहेत याला जनतेच्या दृष्टीने मोठेच महत्त्व असते.

विशेषतः गेली दहा वर्षे आपल्या देशावर मनमोहन सिंग हे पंतप्रधान म्हणून राज्य करत आहेत पण ते दुबळे आहेत. तसे शरद पवार यांनीसुध्दा म्हटले आहे. खुद्द मनमोहन सिंग यांनी ही गोष्ट अनेकदा कबूल केलेली आहे. त्यांनी दहा वर्षे सोनिया गांधी यांच्या हातचे बाहुले म्हणून काम केलेले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपल्या देशातल्या १२० कोटी लोकांच्या दृष्टीने आपला भावी पंतप्रधान कोण असणार आहे याला महत्त्व आले आहे. या देशातल्या लोकांना कोणता पक्ष सत्तेवर येतो यापेक्षा कोणता नेता पंतप्रधान होतो ही गोष्ट महत्त्वाची वाटायला लागली आहे. म्हणूनच नरेंद्र मोदी यांची उमेदवारी लोकांनी उचलून धरली आहे. त्यांना देशातल्या ५८ टक्के मतदारांनी पंतप्रधान म्हणून मत दिले आहे. भारतीय जनता पार्टीला कधी ५८ टक्के मते मिळालेली नाहीत मात्र मोदींना तशी ती मिळतात ही गोष्ट काय सूचित करते? चार राज्यातले निकाल जाहीर झाले तेव्हा सोनिया गांधींची प्रतिक्रिया विचारली असती, त्यांनी आपल्या पक्षाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार लवकरच जाहीर केला जाईल असे म्हटले होते.

या गोष्टीला फार दिवस झालेले नाहीत. फार तर ‘हिना झाला असेल. ‘हिनाभरापूर्वीची वृत्तपत्रे अजूनही काढून वाचता येतील आणि सोनिया गांधींच्या डोळ्यासमोर त्यावेळी राहुल गांधीच होते. त्यानंतर अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना, कॉंग्रेस पक्षाने पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे असे प्रतिपादन केलेले आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवार आधी जाहीर करणे, राहुल गांधी म्हणतात तसे अवैध आणि घटना विरोधी असेल तर चार राज्यातल्या निवडणुकीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सोनिया गांधींनी केलेले विधान घटनाविरोधी होते असे म्हणावे लागेल किंवा पी. चिदंबरम् यांनी जी मागणी केली ती घटनाविरोधी होती असे म्हणावे लागेल. आज कॉंग्रेसने पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याची टाळाटाळ केली असली आणि त्या टाळाटाळीला घटनात्मक निर्णयाचे वलय देण्याचे सोंेग आणले असले तरी त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार राहुल गांधी हाच आहे आणि तो नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वासमोर फिका पडतो याची जाणीव कॉंग्रेसच्या नेत्यांना आहे. राहुल गांधींच्या नावावरून कॉंग्रेस पक्षात प्रचंड संभ्रम आहे.

Leave a Comment