राजापूर – प्रस्तावित जैतापूर माडबन अणुऊर्जा प्रकल्पाच्या माडबन, मिठगवाणे, निवेली, करेल व वरचावाडा या पाच गावांतील प्रकल्पग्रस्तांचा मूळ आणि सानुग्रह अनुदान स्वीकारण्यासाठीचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच आहे. १५ जानेवारीअखेर एकूण २३३६ लाभार्थीपैकी १५५७ लाभार्थीना मूळ अनुदानापोटी देय रकमेच्या १४ कोटी ७७ लाख ३९ हजार ६११ रुपयांपैकी १२ कोटी १५ लाख २१ हजार ३६२ रुपयांचे वाटप झाले. तर सानुग्रह अनुदानापोटी तेवढयाच लाभार्थीना देय २११ कोटी ५५ लाख ८ हजार ५०० रुपयांपैकी १५०६ लाभार्थींना १७२ कोटी ३२ लाख ९० हजार २३१ रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे.
प्रकल्पग्रस्तांना जास्तीत जास्त फायदा व्हावा व या प्रकल्पाचा लाभ त्यांना मिळावा,अशी भूमिका राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी प्रारंभीपासून घेतली होती. ऑगस्ट २०१३मध्ये उद्योगमंत्री राणे यांच्यासोबत प्रकल्पग्रस्तांची रत्नागिरी येथे बैठक झाली व यामध्ये प्रकल्पग्रस्तांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मूळ आणि सानुग्रह अनुदानाच्या वाटपाच्या कामाला गती मिळाली. सप्टेंबर २०१३ ते १५ जानेवारी २०१४ या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत राजापूर तालुका प्रांताधिकारी कार्यालयाने यासाठी धडक आणि गतिमान मोहीम राबवून हे अनुदान वाटप केले. प्रांताधिकारी प्रवीण खाडे यांच्यासह त्यांच्या सहकारी कर्मचा-यांनी यात विशेष परिश्रम घेतले आहेत.