अभिनेत्री पद्मश्री सुचित्रा सेन यांचे निधन

कोलकाता – बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री सुचित्रा सेन यांचे आज सकाळी कोलकाता येथील बेलव्हू हॉस्पिटलमध्ये हृदयक्रिया बंद पडून निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. श्वसनमार्गात संसर्ग झाल्याने त्यांना २३ डिसेंबर रोजीच रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेले काही दिवस त्या व्हेंटीलेटरवर होत्या.

आपल्या प्रभावी अभिनयाने चित्रपट जगतावर मोहोर उमटविणार्‍या सुचित्रा सेन यांनी पन्नास चे दशक गाजवून टाकले होते. शेष कोथाय या पहिल्या बंगाली चित्रपटातून १९५२ साली रजत पडद्यावर आलेल्या सेन यांना १९५५ साली विमल रॉय यांच्या अजरामर देवदास या हिंदी सिनेमात पारोच्या भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविले गेले होते. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळविणार्‍या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या. १९६३ साली मास्को येथे झालेल्या फिल्म फेस्टीव्हलमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला होता.

१९७८ सालापासून त्या चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्या होत्या. इतकेच नव्हे तर २००५ साली सार्वजनिक कार्यक्रमात यावे लागू नये म्हणून त्यांनी मानाचे दादासाहेब फाळके अॅवॉर्ड घ्यायलाही नकार दिला होता. देवदास, बंबई का बाबू, ममता, आंधी असे एकाहून एक सरस चित्रपट त्यांनी आपल्या भूमिकांनी गाजविले तसेच अनेक क्लासिक बंगाली चित्रपटातूनही त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत.

Leave a Comment