काबूल – अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला पोलिस प्रमुख म्हणून कर्नल जमील बायज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २५ वर्षे पोलिस सेवेत कार्यरत असणार्या जमील यांची काबूलमध्ये नेमणूक झाली असून देशाच्या सर्वोच्य प्रशासकीय पदावर नियुक्ती होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. जमील यांच्या नेमणुकीनंतर अफगाणिस्तानच्या पोलिस दलात महिलांना अधिक संधी उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
जमील म्हणतात, माझ्यामुळे पोलिस दलात कार्यरत असलेल्या अन्य महिला पोलिसांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे. अफगाणिस्तान महिला अधिकार्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फारसा सुरक्षित देश नाही. तालिबानचा प्रभाव असलेल्या या देशात सातत्याने महिला अधिकार्यांवर हल्ले करून त्यांना ठार केले जात आहे. गतवर्षीच कार्यालयातून घरी परतणार्यां अधिकारी महिलेची हत्या करण्यात आली होती. तसेच इस्लाम बिवी या लेफ्टनंट महिलेला तिच्या भावांनीच सतत धमक्या देऊन अखेर तिला गोळ्या घालून ठार केले. मात्र अफगाणी महिलांसाठी इस्लाम बिवी प्रेरणास्त्रोत बनली आहे.