पोप फ्रान्सिसच्या हर्ले डेव्हीडसनचा होणार लिलाव

व्हॅटिकन सिटी – पोप फ्रान्सिस यांना हर्ले डेव्हीडसन या मोटरबाईक उत्पादक कंपनीने त्यांच्या ११० व्या वर्धापनदिनामिमित्त भेट दिलेल्या हर्ले डेव्हिडसन मोटरसायकलचा ब्रिटनमधील ऑक्शनहाऊस तर्फे ६ फेब्रुवारीला पॅरिस येथे लिलाव केला जाणार आहे. लिलावातून आलेली रक्कम डॉन लुगी डी लिग्रो या अनाथालयाला दिली जाणार आहे. या अनाथालयात सुमारे १० हजार अनाथांना दररोजचे जेवण आणि निवारा दिला जातो.

समजलेल्या माहितीनुसार पोपला भेट दिली गेलेली मोटरसायकल १५८८ सीसीची डायना सुपर ग्लाईड ही आहे. ती जूनमध्ये कंपनीने ११० व्या वर्धापनदिनामिमित्त भेट दिली होती. याचवेळी कंपनीने याच कंपनीचे लेदर जॅकेटही पोपना भेट दिले होते. पोप फ्रान्सिस हे साध्या राहणीबाबत आग्रही आहेत आणि आपल्या वर्तणुकीतून त्यांनी नेहमीच ते सिद्ध केलेले आहे. या मोटरसायकलचा १० लाख ते १३ लाख रूपये किंमतीला लिलाव होईल अशी अपेक्षा आहे. या मोटरसायकलच्या पेट्रोल टाकीवर पोपची सही आहे तसेच लेदर जॅकेटवरही त्यांची सही आहे. पोप आणि हर्ले डेव्हीडसन या दोघांनाही या लिलावातून मिळणारी रक्कम योग्य कारणासाठी वापरली जाणार आहे याचा अभिमान वाटतो आहे.

पोप फ्रान्सिस यांनी अधिकारग्रहण केल्यापासून सतत त्यांच्या सहृदयतेचे दर्शन घडविले आहे. त्यांच्यासाठी तैनात केलेल्या मर्सिडीज बेंझ चा वापर न करता ते त्यांची ३० वर्षे जुनी रेनॉल्ट गाडीच वापरतात. इतकेच नव्हे तर पोप पदी निवड झाल्यानंतरही बुलेट प्रूफ मर्सिडिज लिमोसिन मधून न जाता त्यांनी सोबतच्या कार्डिनलसह मिनीबस मधूनच प्रवास केला होता.

Leave a Comment