मध्यप्रदेशातील गव्हाला परदेशातून मोठी मागणी

नवी दिल्ली – मध्यप्रदेशातील गव्हाला परदेशातून मोठी मागणी येत आहे. केंद्र्र सरकारने त्यामुळे निर्यात केल्या जाणार्‍यां गव्हात मध्यप्रदेशातील गहू अधिक प्रमाणात निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण गहू निर्यातीच्या ५० टक्के गहू मध्यप्रदेशातील असेल असे सांगितले जात आहे. आत्तापर्यंत निर्यात झालेल्या ५ लाख टन गव्हापैकी ३ लाख टन गहू मध्यप्रदेशातील आहे आणि मार्चपर्यंत हाच आकडा ९ लाख टनांवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भारतातील पंजाब, हरियाना आणि उत्तर प्रदेश ही गव्हाची निर्यात करणारी अन्य राज्ये आहेत. केंद्रने २० लाख टन गहू निर्यातीचा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेशील गव्हाची गुणवत्ता उत्तम प्रतीची आहे. सरबती आणि माळवा जातीचे गहू खाण्यास उत्तम असून अधिक पौष्टीक आहेत. चमकदार दाण्याच्या या गव्हापासून बनलेल्या पोळ्या, रोटी अथवा पाव अधिककाळपर्यंत नरम राहात असल्याने परदेशातून या गव्हाला अधिक पसंती दिली जात आहे असे समजते.