वनडे क्रिकेटमध्ये धोनी टाकणार अझरुद्दीनला मागे

नवी दिल्ली – टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता कसोटी क्रिकेटनंतर वनडे क्रिकेटमध्येही टीम इंडियाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार होणार असे दिसत आहे. आगामी काळात टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौ-याप्रसंगी धोनीला ही संधी चालून आली आहे. टीम इंडियाकडून सध्या सर्वाधिक यशस्वी वनडे कर्णधार असलेल्या मोहमंद अझरुद्दीनने ९० विजय मिळवले आहेत. त्याला मागे टाकण्यासाठी धेनीला आता केवळ तीन सामन्यात विजयांची आवश्यकता आहे.

यापूर्वी महेंद्रसिंग धोनी यांने कसोटी क्रिकेटमधील देशाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. आता आगामी काळात होत असलेल्या वनडेत त्याच्याकडे सर्वाधिक यशस्वी कर्णधार मोहंमद अझरुद्दीनला मागे टाकण्याची संधी आहे. अझरुद्दीनने १९९० ते १९९९ या काळात १७४ सामन्यांत भारताचे नेतृत्व केले. यामध्ये त्याने ९० सामन्यात विजय मिळवला, तर ७६ सामन्यांत पराभव झाला. दोन सामने टाय झाले, तर सहा लढतींचा निकाल लागला नाही. दुसरीकडे धोनीने आतापर्यंत १५४ सामन्यांत भारताचे नेतृत्व केले असून, त्याने ८८ सामने जिंकले आहेत. ५३ सामन्यांत भारताचा पराभव झाला असून १० सामन्यांचा निकाल आला नाही.

त्या सोबतच वनडेमध्ये सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करण्याबाबत धोनी सहाव्या क्रमांकावर आहे. त्याच्या पुढे मोहमंद अझरुद्दीन (१७४), ऑस्ट्रेलियाचा अॅसलन बॉर्डर (१७८), श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा (१९३), न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग (२१८) आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (२३०) आहेत