मुंबई- सुंदर आवाजाच्या माध्यमातून व गायनाने सहा दशकांपेक्षा अधिक काळ आपल्या रसिकांना मंत्रमुग्ध करणार्याद आशा भोसले यांना भारती विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट ऑफ लेटर्स (डी.लिट) या पदवीने सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद़दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
नुकतेच भारती विद्यापीठातर्फे आशा भोसले यांना डी.लिट या पदवीने तर विज्ञान व संशोधनातील योगदानाबद्दल भारतरत्न घोषित झालेल्या शास्त्रज्ञ सी एन आर राव यांना मानाची सर्वोच्च डॉक्टरेट ऑफ सायन्स या पदवीने सन्मानित करण्यात आले. भारती विद्यापीठाच्या १५व्या पदवीदान समारंभात विद्यापीठाचे कुलपती पतंगराव कदम यांच्या हस्ते दोघानांही पदवी प्रदान करण्यात आली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात सुवर्णपदकविजेत्या विद्यार्थांना आशा भोसले, सीएनआर राव व डॉ. नरेंद्र जाधव यांनी अभिनंदन केले. यावेळी बोलताना ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सर्वात मोठ प्रेम म्हणजे देशप्रेम आणि कर्तव्य म्हणजे देशसेवा असल्याचे म्हटले आहे. तसेच भारती विद्यापीठातर्फे डॉक्टरेट पदवी मिळाल्याचा आनंद झाला असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.