बगदाद – इराकची राजधानी असलेल्या बगदाद शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात एकूण १२ जण ठार झाल्याची माहिती सुरक्षा अधिका-यांनी बुधवारी दिली. बगदाद शहरातील विविध ठिकाणी हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. साखळी बॉम्बस्फोटांपैकी एक स्फोट बगदादमधील उत्तर भागात प्रसिद्ध असलेल्या मार्केटजवळ पार्क केलेल्या गाडीत झाला. यात पाच दुकानदार ठार झाले असून अन्य १२ जण जखमी झाले.
दुसरा बॉम्बस्फोट मध्य कर्राडा भागातील मोटारीत झाला. यात चार नागरिकांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. त्यानंतर पूर्व मामील भागातील बाजारात आणखी एक बॉम्बस्फोट झाला. यामध्ये तीन नागरिक ठार तर आठ जण जखमी झाल्याची माहिती पोलिस अधिका-यांनी दिली. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या साखळी बॉम्बस्फोटामागे दहशतवादी यंत्रणांचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस यासंबंधी पुढील तपास करत आहेत.