नवी दिल्ली – पंढरपूरचा विठ्ठल अखेर बडव्यांपासून मुक्त झाला आहे. कारण आता विठ्ठल मंदिराचे अधिकार बडव्यांकडे नाहीत, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. राज्य सरकारने स्थापन केलेला ट्रस्ट बरखास्त करुन, मंदिराचे अधिकार आपल्याकडे देण्याची याचिका बडव्यांनी 1976 साली केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना खालच्या कोर्टात जाण्याचे आदेश दिले होते.
पण सर्व ठिकाणी केस हरल्यानंतर बडव्यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे विठ्ठल मंदिरावर ताबा मिळवण्याचा बडव्यांचा अखेरचा प्रयत्नही अयशस्वी झाला आहे.
1985 साली मंदिर समिती अस्तित्त्वात आली होती. याच वर्षी मंदिर समितीने बडव्यांकडून संपूर्ण ताबा घेतला होता. फक्त पुजा करण्याचे अधिकार बडव्यांकडे होते. मात्र मार्च 2007 साली बडव्यांचे सर्व अधिकार उच्च न्यायालयाने रद्द केले होते. त्यामुळे बडव्यांनी सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल केली होती.