सिमेंट महागले – घरांच्या किमती वाढणार

मुंबई – देशातील लहान मोठ्या सर्व सिमेंट कंपन्यांनी सोमवारपासून सिमेंटचे दर पोत्यामागे २५ ते ४० रूपयांनी वाढविले आहेत. स्टील कंपन्यांनीही यापूर्वीच दरवाढ केली आहे. परिणामी स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना आता अधिक किंमत मोजावी लागणार आहे. कारण सिमेंट आणि स्टील दरवाढीचा विपरित परिणाम रिअल इस्टेट व्यवसायावर होणार आहे.

तोंडावर आलेल्या निवडणूका आणि चालू आर्थिक वर्षातील शेवटची तिमाही यामुळे अनेक सरकारी योजना पूर्ण करण्याची लगबग सुरू झाली आहे. रस्ते. विमानतळ, अन्य इमारतींच्या बांधकामाने गती घेतली आहे. यामुळे सिमेंटची मागणी वाढली असून कंपन्यांनी नफा मिळविण्यासाठी सिमेंट दरवाढ केली असल्याचे सांगितले जात आहे. सिमेंट उत्पादकांच्या मते मात्र बर्‍याच कालावधीनंतर सिमेंटचे दर वाढले आहेत. गेले कांही महिने सिमेंटला मागणीच नसल्याने दर स्थिर होते. डिसेंबरमध्ये तर किमती १५ रूपयांनी घटल्या होत्या. मात्र यंदा मान्सून चांगला झाला आहे त्यामुळे ग्रामीण भागांतूनही सिमेंटला चागंली मागणी येण्याची अपेक्षा आहे