लोकसभा उमेदवार यादीत अजित पवार नाहीत

मुंबई – नरेंद्र मोदी आणि आम आदमी पार्टीचा प्रभाव कमी व्हावा आणि आपल्या उमेदवारांना निवडणक तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी २१ जानेवारीला करण्याचे ठरविले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या सरकारी निवासस्थानी या संदर्भात सोमवारी झालेल्या बैठकीला शरद पवार उपस्थित होते व त्यातच उमेदवारांविषयी चर्चा करण्यात आली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. मात्र या यादीत अजित पवार यांच्या नावाचा समावेश नाही.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती आहे. मात्र सीट वाटपाबाबतची बैठक अद्यापी झालेली नाही. तरीही राष्ट्रवादीने आपले उमेदवार निश्चत केले असून गेल्या वेळी जिंकलेल्या सर्व उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाणार आहे. २२ जागांपैकी राष्ट्रवादीने गेल्या निवडणकांत ८ जागांवर विजय मिळविला होता. यंदा राज्यातील मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, गणेश नाईक, देवदत्त क्षीरसागर, सुरेश धस लोकसभेसाठी उमेदवार असतील असे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव या संदर्भात म्हणाले की २-३ जागा वगळता बाकी सर्व जागांसाठी उमेदवारांची नांवे निश्चित करण्यात आली आहेत. आमच्या वाटणीला गेल्या वेळी २२ जागा आल्या होत्या. पैकी चार जागांवर उमेदवार अदलाबदल होण्याची शक्यता आहे. आमच्या वाटणीच्या जळगांव, बुलढाणा, कोल्हापूर, हतकणंगले व मावळ व काँग्रेसच्या वाटणीच्या औरंगाबाद, रायगड, जालना या जागांविषयी चर्चा अपेक्षित आहे. मात्र काँग्रेस बरोबर जागा वाटपाची बैठक इतक्यात झाली नाही तरी २१ जानेवारीला आम्ही आमची पहिली यादी जाहीर करणार आहोत.

Leave a Comment