गंगासागरला आज सायंकाळी पवित्र स्नान

सागर- सुमारे ६५ वर्षांनंतर पुन्हा जुळून आलेल्या योगावर मकरसंक्रांतीनिमित्त गंगासागरमध्ये पवित्र स्नान आज सायंकाळी होत असल्याचे कपिल मुनी मंदिराच्या मुख्य पुजार्‍यांनी जाहीर केले आहे. आज सायंकाळी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आहे. त्यामुळे दरवर्षी सकाळी होणारे पवित्र स्नान सायंकाळी होईल असा खुलासा मंदिराच्या पुजार्‍यांकडून केला गेला आहे.

गंगा जेथे सागराला मिळते, त्या ठिकाणी मकरसंक्रांतीदिवशी पवित्र स्नान करण्याची हिंदू धर्माची प्रथा आहे.यंदाही या यात्रेसाठी तीन लाखांहून अधिक भाविक देशभरातून हजर झाले आहेत. कुंभ मेळ्यानंतर दुसर्‍या नंबरचा हा मोठा मेळा मानला जातो. आज सायंकाळी ७ वाजून ४ मिनिटांना पवित्र स्नानाचा मुहूर्त आहे. यावेळी या गंगासागरात भाविक डुबकी घेतील.

प.बंगालचे मंत्री सुब्रत मुखर्जी आणि ऊर्जामंत्री मनीष गुप्ता यांच्याकडे या मेळ्याची जबाबदारी सोपविली गेली असून संरक्षणासाठी ६ हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत.