अमेरिकेचे तापमान -५० तर ऑस्ट्रेलियाचे +५०

न्यूयॉर्क- उत्तर ध्रुवावरील हिमवादळामुळे अमेरिकेत अभूतपूर्व थंडीचा कहर कायम आहे. या अभूतपूर्व थंडीमुळे अमेरिकेतील काही राज्यांमध्ये -५० अंश सेल्शियस असा तापमानाचा नीचांक प्रस्थापित झाल्यावर अगदी नायगरा धबधबाही गोठून गेला होता. मात्र, जागतिक तापमानाचा विरोधाभास याच काळात अनुभवायला मिळत आहे.

अमेरिकेत हुडहुडी भरलेली असतानाच दक्षिण ध्रुवाजवळ असलेल्या ऑस्ट्रेलियात घामाच्या धारा लागल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील तापमान ५० अंश सेल्शियसवर पोहचले आहे. हे वर्ष ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक ह्यतापह्णदायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. ऑस्ट्रेलियातील हवामान खात्याने सांगितले की, देशाच्या दक्षिण भागात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. या भागातील तापमान ५०.७ अंशावर पोहोचले आहे.

या भागात राहणारे नागरिक उन्हाळ्याने हैराण झाले आहे. घरात उकाडा जाणवत असून पंख्याने त्यावर मात करणे अशक्य बनले आहे. उत्तर ऑस्ट्रेलियात मान्सूनचे आगमन उशीरा झाल्याने त्याचा मोठा फटका बसला आहे. या प्रकरणात ग्लोबल वॉर्मिगचाही मोठा हात आहे, असे ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाचे व्यवस्थापक कर्ली ब्रगांझा यांनी सांगितले.