राज ठाकरे यांची बडबड

सध्या देशात नरेंद्र मोदी यांना महत्व आले आहे. ते त्यांच्या भाषणामुळे आले असल्याचे म्हटले जात आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांनी आपल्या भाषणाला कृतीची जोड दिलेली आहे. हाती सत्ता आल्यानंतर ती राबवून दाखवली आहे. राज ठाकरे यांना मात्र आपल्या भाषणाला आणि बोलण्याला प्रशासकीय कौशल्याची किंवा विकास कामांची जोड देता आलेली नाही. त्यामुळे त्यांनी आता नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करायचे ठरवले असले तरी त्यांच्या या शब्दांना कोणीही महत्व देणार नाही. त्यांनी मोदी यांच्या टिकेबरोबरच महाराष्ट्रात आपचा बाप बनण्याची वल्गना केली आहे. पितृत्व असे मागून मिळत नसते. राज ठाकरे यांनी आपला पक्ष स्थापन केल्यापासूनच्या आठ वर्षात महाराष्ट्रात काय काम केले आहे हे दाखवून द्यायचा प्रयत्न केला तर त्यांना काही सुद्धा सांगता येत नाही. आम आदमी पार्टीने दिल्लीत आठ दिवसात जे प्रशासकीय कौशल्य दाखवून दिले आहे त्याच्या अल्पाशांने सुद्धा मनसेला आठ वर्षात दाखवून देता आलेले नाही. आम आदमी पार्टीचा दिल्लीतला उदय ज्या लोकांना सहन होत नाही ते लोक, हा एक बुडबुडा आहे आणि तो लवकरच फुटेल, अशी भविष्यवाणी करत आहेत. तो नक्की फुटणार आहे की नाही हे माहीत नाही. परंतु असे अनेक बुडबुडे देशात फुटले असल्यामुळे अरविंद केजरीवाल यांचा हाही बुडबुडा असाच फुटेल, असे लोकांना वाटते. त्यांच्या या वाटण्याला इतिहासाचा आधार आहे. महाराष्ट्रात तरी आहे.

महाराष्ट्रात मनसे नावाचा एक बुडबुडा निर्माण होऊन फुटलेला आहे आणि गमतीचा भाग असा की, हा फुटलेला बुडबुडाच नरेंद्र मोदींना शहाणपणा शिकवायला लागला आहे. २००५ साली मनसेची स्थापना झाली. तिच्या स्थापनेने शिवसेनेच्या मतात फूट पडणार आणि या फुटीचा फायदा कॉंग्रेसला होणार हे उघडच होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे सरकार पुन्हा महाराष्ट्रात येणार असे भविष्य वर्तविण्याची हिंमत कॉंग्रेसचे नेते सुद्धा करत नव्हते इतकी या सरकारची अवस्था वाईट होती. परंतु राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या मतात पाडलेल्या फुटीमुळे कॉंग्रेस पुन्हा सत्तेत आली. या उपकाराची परतफेड म्हणून कॉंग्रेसच्या नेत्यांनी तसेच त्यांची टिमकी वाजविणार्‍या माध्यमांनी राज ठाकरेंना महत्व देऊन मोठे करायचे ठरवले. परंतु आपल्याला खरोखर नेमके कशाने महत्व आले आहे याची जाणीव राज ठाकरे यांना राहिली नाही. बेफाम भाषण करण्याच्या जोरावर आणि कुणाचीही टिंगल टवाळी करण्याच्या सवयीमुळे त्यांच्या सभांना प्रतिसाद मिळत गेला आणि या बुडबुड्याचे सत्य स्वरूप न कळलेल्या जनतेच्या मतांवर या पक्षाचे ११ आमदार निवडून आले. नाशिकची महापालिका त्यांच्या ताब्यात आली. मात्र हे ११ आमदार आणि एक महापालिका यांनी राज ठाकरे यांच्या भाषणातून व्यक्त होणार्‍या वेगळ्या शैलीचे दर्शन कधी घडवलेच नाही.

गेल्या दोन वर्षांपासून राज ठाकरे यांना त्यांचा पक्ष नाशिकमध्ये काय करणार आहे असा प्रश्‍न विचारला जातो. परंतु त्याचे सरळ उत्तर राज ठाकरे यांनी कधीच दिलेले नाही. त्यांनी काम करून तर दाखवले नाहीच, पण काय काम करणार आहोत याची एखादी योजना सुद्धा जनतेला सादर केली नाही. कामगिरीच्या पातळीवर राज ठाकरे यांचा बुडबुडा पूर्णपणे फुटलेला आहे. त्यामुळे मनसेच्या स्थापनेच्या काळात त्यांच्या विषयी जे आकर्षण होेते ते अल्पांशाने सुद्धा टिकले नाही. आता राज ठाकरे महाराष्ट्रात आपची काही गरज नाही, आपचा बाप मीच आहे असे कितीही सांगत असले तरी आपचा बाप होण्याची पात्रता ते मागेच गमावून बसले आहेत. आपल्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचा ब्ल्यू प्रिंट आहे असे म्हणणार्‍या राज ठाकरे यांना एका महापालिकेच्या विकासाचा ब्ल्यू प्रिंट सुद्धा सादर करता आलेला नाही. इतरांना शिवीगाळ करून भाषणे गाजवणे ही गोष्ट सोपी असते, पण हातात कारभार घेऊन तो व्यवस्थित हाकणे ही गोष्ट अवघड असते. किंबहुना राज ठाकरे यांना तरी ही गोष्ट जमलेली नाही. लोक सभेला गर्दी करतात, पण काम करून दाखवता न आल्यास कोणी महत्व देत नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये टाईम्स् ऑफ इंडियाने केलेले एक सर्वेक्षण चर्चेचा विषय झालेले आहे. त्या सर्वेक्षणात पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून ५८ टक्के मतदारांनी नरेंद्र मोदी यांना पसंती दिली आहे.

अरविंद केजरीवाल यांना २५ टक्के मतदारांनी तर राहुल गांधी यांना १४ टक्के मतदारांनी पंतप्रधानपदासाठी मत दिले आहे. अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी या दोघांच्या मिळून होणार्‍या मतांपेक्षा नरेंद्र मोदींची मते २० टक्क्यांनी जास्त आहेत. खरे म्हणजे अरविंद केजरीवाल हे काही पंतप्रधानपदाचे उमदेवार नाहीत. त्यामुळे येत्या निवडणुकीत राहुल आणि मोदी यांच्यातच संघर्ष होणार आहे. या संघर्षात अरविंद केजरीवाल यांची २५ टक्के मते मोदींनाच मिळणार आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या पसंतीचे मतदान मोदी ८३ टक्के आणि राहुल गांधी १५ टक्के असे होणार आहे. ही गोष्ट का घडेल, हे राज ठाकरे यांना कळले पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी काम करून दाखवले आहे. त्यांच्या कामाच्या जोेरावर ते गुजरातेत सलग तीन वेळा दोन तृतीयांश बहुमत घेऊन निवडून आलेले आहेत. ही त्यांची खरी शक्ती आहे.

आता मोदींच्या विरुद्ध कोणीही काहीही बोलले तरी ही वस्तुस्थिती बदलणार नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी आपल्या गुजरातमध्ये केलेल्या कामगिरीचा आपल्या भाषणातून आवर्जून उल्लेख करत आहेत. हा काही प्रादेशिकवाद होऊ शकत नाही. परंतु राज ठाकरे यांनी त्याला महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असे संकुचित स्वरूप देऊन आपला गेलेला टीआरपी वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी फुटलेला बुडबुडा पुन्हा कधी निर्माण होऊ शकत नसतो हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. राज ठाकरे यांनी स्वत:ला आपचा बाप म्हणवले काय की आपचा आजोबा म्हणवले काय, याला काही महत्व नाही. त्यांना मतदार काय म्हणणार आहेत याला महत्व आहे आणि मतदार केलेल्या कामाला महत्व देतात, नुसत्या वल्गनांना महत्व देत नाहीत आणि काम न केल्यामुळेच राहुल गांधींना मिळणारी मते घटत चालली आहेत.

Leave a Comment