हाँगकाँग – नवीन वर्षाच्या संध्येला हाँगकाँगमध्ये लोकशाहीसाठी चीनवर दबाव आणण्याच्या उद्देशाने येथील नागरिकांनी निदर्शने आणि मोर्चे काढले असल्याचे समजते. २०१७ मध्ये हाँगकाँगमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुका पूर्ण लोकशाही मार्गाने व्हाव्यात अशी नागरिकांची मुख्य मागणी असून त्याला चीनच्या कम्युनिस्ट राज्यकर्त्यांचा विरोध आहे. यामुळे चीनवर लोकशाहीसाठी दबाव टाकावा यासाठी आत्तापासूनच आंदोलने सुरू केली गेली आहेत असे समजते.
या निवडणुकात लोकशाही समर्थकांना यश मिळेल अशी भीती चीनी राज्यकर्त्यांना आहे परिणामी लोकशाही समर्थक आणि कम्युनिस्ट पार्टीचे नेते यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. नव वर्षाचे निमित्त काढून झालेल्या निदर्शनात निदर्शकांनी २०१७ मध्ये हाँगकाँगमध्ये पूर्ण लोकशाही यावी, निवडणक कुणालाही लढविता यावी आणि चीनच्या टिकाकारांनाही निवडणूक लढविण्यापासून अडविले जाऊ नये अशा मागण्या केल्या आहेत मात्र या मागण्या चीनी राजवटीने नामंजूर केल्या आहेत. हाँगकाँगमध्ये चीनचा वाढता हस्तक्षेपही हाँगकाँगवासियांना मान्य नाही आणि चीन जी राजवट हाँगकाँगवर लादू पाहते आहे त्याचा विरोध करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.