साखळी चोरांची गँग पोलिसांनी पकडली

पुणे – पिपरी चिंचवड आणि पुणे परिसरात साखळी चोर्‍या करणार्‍या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली असून त्यातील एक क्रिकेटपटू आहे. या पाच जणांकडून पोलिसांनी ६० तोळे सोने आणि दुचाकींसह २० लाख रूपयांचा माल जप्त केला आहे. गेले अनेक दिवस शहरात सातत्याने साखळीचोर्‍या होत आहेत मात्र पोलिसांना त्यावर नियंत्रण आणणे शक्य झालेले नाही. त्यामुळे पोलिसांवर टीकेचा भडीमार होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरीच्या मोहननगर भागात दोन तरूण संशयास्पद रितीने फिरताना पोलिसांना आढळले. त्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला तेव्हा ते दुचाकीची नंबरप्लेट बदलण्याचा खटाटोप करत होते. पोलिसांनी या दोघांनी ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्यांनी साखळी चोर्‍या केल्याचे कबूल केले शिवाय आपल्या अन्य साथीदारांची नांवेही पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी बाकी जणांना ताब्यात घेतले. चौकशीत या पाच जणांनी ४८ठिकाणी साखळी चोर्‍या केल्याचे मान्य केले आहे.

नीलेश रस्ते, प्रशांत ठाकूर, मुन्ना जाकीर अंन्सारी,राहुल गवळी आणि अशोक मटके अशी त्यांची नांवे आहेत. पैकी मटके हा क्रिकेटपटू असून त्याने महाराष्ट्र आणि अन्य देशांतील टूर्नामेंटमध्ये भागही घेतलेला आहे. नुकताच तो नागूपर क्रिकेट असोसिएशनतर्फे नेपाळ येथे सामने खेळण्यासाठी जाऊन आला आहे. तर प्रशांत ठाकूर हा बारावीचा विद्यार्थी आहे. या पाच जणांनी पिंपरी, चिंचवड, भोसरी, हिंजेवाडी, निगडी, सांगवी या परिसरात साखळी चोर्‍या केल्या आहेत. या चोर्‍यासाठी ते अगोदर पूर्ण प्लॅनिंग करत असत आणि विना नंबरप्लेटची दुचाकी वापरत असत अथवा नंबरप्लेट उलटी करून ठेवत असत असेही चौकशीत समोर आले आहे.

Leave a Comment