पॅलेस्टीनच्या राजदूताचा बॉम्बस्फोटात मृत्यू

पॅलेस्टीनच्या झेक रिपब्लिक देशातील राजदूत जमाल अल जमाल यांचा प्रागमधील बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. प्रागमधील राजदूताच्या निवासस्थानी बुधवारी सकाळी हा बॉम्बस्फोट झाला. या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. जमाल यांनी ऑक्टोबर महिन्यात कार्यभार स्विकारला होता. तसेच प्रागमधील नव्या घरातही त्यांनी नुकताच प्रवेश केला होता.

अल जमाल हे जुन्या घरातून आणलेला कपाट उघडत असताना हा स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जमाल यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घातक स्फोटके हाताळताना निष्काळजीपणामुळे हा स्फोट झाल्याचे येथील नोविन्की.सीझेड न्यूज या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

जमाल यांच्यासह जबर जखमी झालेल्या ५६ वर्षीय इसमावर प्राग सैन्यदलाच्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे रुग्णालय प्रवक्त्या जिरिना इर्नेस्तोवा यांनी सांगितले. तर आणखी एका ५२ वर्षीय महिलेला अन्य एका रुग्णालयात दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. बॉम्बस्फोट झाला त्यावेळी जमाल यांचे सर्व कुटूंबीय निवासस्थानीच होते, असे दूतावासातील अधिका-यांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास सुरु आसल्याचे पोलिसांनी सांगितले.