गॅस सिलिंडर २२० रुपयांनी महागले

नवी दिल्ली- इंधन दरवाढीपाठोपाठ नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी विना-अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल २२० रुपयांची वाढ केली आहे. घरगुती ग्राहकांना वर्षभरात नऊ अनुदानित गॅस सिलिंडर दिले जातात. त्याऐवजी आता १२ सिलिंडर मिळतील, अशी कुणकूण असतानाच तेल कंपन्यांनी, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही दरवाढ केली आहे. त्यामुळे सध्या १०२१ रुपयांना मिळणारा सिलिंडर आता १२४१ रुपयांना घ्यावा लागणार आहे. तर मुंबईत सध्या १,०३८ रुपयांना मिळणारा सिलिंडर आता १२६४.५० रुपयांना घ्यावा लागणार आहे.

गॅस सिलिंडरच्या दरात ही महिनाभरातील तिसरी भाववाढ आहे. एक डिसेंबर रोजी ६३ रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर पाच राज्यांच्या निवडणूका आटोपताच पून्हा ११ तारखेला एलपीजीचा पुरवठा करणा-या वितरकांच्या कमिशनमध्ये केंद्र सरकारने वाढ केली. वितरकांना कमिशन देण्यासाठी आणखी ३ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे देशभरात अनुदानित सिलिंडर ३ रुपये ५० पैशांनी तर, विनाअनुदानित सिलिंडर ४.२१ रुपयांनी महागला.

केंद्र सरकारने सप्टेंबर २०१२ मध्ये सहा अनुदानित गॅस सिलिंडर देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यात बदल करुन जानेवारी २०१३ पासून अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या नऊ करण्यात आली. इराण आणि पश्‍चिमेकडील देशांतील वाद आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत असल्याने भारतात इंधन दरात वाढ होत आहे. गेल्या महिन्यातच डिझेलचे दरही वाढले आहेत.