सोनियांप्रमाणे मोदींनीही माफी मागावी – चिदंबरम

नवी दिल्ली – देशात 1984 मध्ये झालेल्या शीख दंगलीप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्याप्रमाणे माफी मागितली होती. तशाच प्रकारे 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे.

एका मुलाखतीत बोलताना चिदंबरम म्हणाले, ”मोदी यांनी गुजरात दंगलीची नैतिक जबाबदारी स्वीकारून जनतेची माफी मागावी. आम्ही त्यांना कोणताही गुन्हा करण्यास सांगत नाही. फक्त त्यांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देत आहोत.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात 1984 मध्ये झालेल्या शीख दंगलीप्रकरणी सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नागरिकांची माफी मागितलेली आहे.” पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत चिदंबरम यांना विचारले असता ते म्हणाले, की मला माझ्या मर्यादा माहित आहेत. त्यामुळे माझी पंतप्रधान होण्याची कसलीही इच्छा नाही. मी काय करू शकतो, हे मला माहित आहे. मला विश्वास आहे, की 2014 मध्ये पुन्हा काँग्रेस सत्तेत येईल.

Leave a Comment