राहुल गांधी म्हणजे ‘आकाशवाणी’ – नरेंद्र मोदी

रांची (झारखंड)- भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना लक्ष्य करताना महागाई आणि भ्रष्टाचारावर काहीही न करता कॉंग्रेस नेते केवळ “आकाशवाणी’सारखे येतात, असा टोला लगावला. येथील एका मेळाव्यादरम्यान मोदींच्या वक्‍तव्याला कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिल्लीत बोलाविलेल्या कॉंग्रेसशासित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा संदर्भ होता.

या बैठकीत राहुल यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना महागाई कमी करण्याबरोबरच लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी आदर्श इमारत गैरव्यवहार प्रकरणाचा चौकशी अहवाल फेटाळण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. धुर्वामध्ये आयोजित “नकली संसद’वरून मोदींनी कॉंग्रेसवरही हल्लाबोल केला. मोदींच्या भाषणासाठी व्यासपीठाला संसदेचा आकार देण्यात आला होता.

गुजरात दंगल प्रकरणी अहमदाबाद न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर मोदींची ही पहिलीच सभा होती. मोदींनी राहुल यांचे नाव घेण्याचे टाळले. मात्र, त्यांच्या वक्तव्यांना “आकाशवाणी’ असे संबोधून संकेत करीत होते. राहुल गांधी यांना लक्ष्य करताना मोदी यांनी त्यांचे नाव न घेता सांगितले, की पुराणात आकाशवाणीचा उल्लेख आहे. सध्याही असेच होत आहे. सध्याच्या बिकट परिस्थितीला जबाबदार असलेले लोकच आकाशवाणी करीत आहेत. पत्रकारांना बोलावितात आणि आकाशवाणी करून प्रसिद्ध केले जाते.

पुराणात आकाशवाणी विचार करायला भाग पाडत होती, आज त्यांचे कट-कारस्थान उघड करते. जे आकाशवाणी करीत आहेत, त्यांच्या बोलण्यात जर प्रामाणिकपणा आहे, तर त्यांनी कॉंग्रेसशासित झारखंडमधील भ्रष्टाचाराचे उत्तर द्यावे. कॉंग्रेस पक्ष देशासाठी ओझे बनला आहे. कॉंग्रेस स्वत:च देशासाठी संकट बनले आहे. कारण, कॉंग्रेस जनतेपासून दूर गेली आहे.

कॉंग्रेसच्या सरकारांना आणि नेत्यांना जनतेचा आवाज ऐकू जात नाही. लोकांना आज विकास हवा आहे, विभाजन नको आहे. त्यांना संधी हवी आहे, राजकीय संधिसाधूपणा नको आहे. त्यांना सुरक्षा हवी आहे, जातीयवादाचे विष नको आहे, असे मोदी म्हणाले. झारखंडमध्ये भरपूर नैसर्गिक साधनसंपदा आहे. हे राज्य जगातील समृद्ध देशांची बरोबरी करू शकते. मात्र, हे राज्य गरीब का आहे? स्वातंत्र्यानंतर ज्यांनी या देशाचे नेतृत्व केले, त्यांना याचे उत्तर द्यावे लागेल.

दिल्लीच्या सरकारने स्वातंत्र्यापासून झारखंडचा आवाज ऐकला नाही. झारखंडला दाबले गेले, मुस्कटदाबी केली. मात्र, अटलबिहारी वाजपेयी यांनी झारखंडच्या लोकांच्या भावना ओळखल्या आणि स्वतंत्र राज्य स्थापन केले. आज जे लोक दिल्लीत बसले आहेत, ज्यांनी 50 वर्षे झारखंडची मागणी धुडकावली, ते या राज्याचे भले कसे काय करू शकतात. झारखंडमध्ये लोकसभेच्या 14 जागा आहेत. पुढील वर्षी निवडणूक आहे. सर्व चौदा जागा राजनाथसिंह यांच्या पायाशी घालून झारखंडचे भविष्य बनवा, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Comment