अमेरिकेत खोब्रागडे यांच्या विरुद्ध निदर्शने

न्यूयॉर्क – मानवी हक्क विषयक संघटना विशेषत: मोलकरणींच्या संघटनांनी काल न्यूयॉर्कमध्ये भारतीय वकिलातीतील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्या विरुद्ध निदर्शने केली. खोब्रागडे यांच्या मोलकरणीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी खोब्रागडे यांच्यावर खटला भरताना त्यांच्या राजनैतिक स्थितीचा लाभ त्यांना मिळता कामा नये, अशी मागणी या निदर्शनात सहभागी झालेल्या महिलांनी केली.

या निदर्शनांचे नेतृत्व नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स अलायन्स या संघटनेने केले होते आणि त्यात सेङ्ग हॉरिझॉन या संघटनेचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. त्याशिवाय अन्यही काही संघटना त्यात सहभागी होत्या. देवयानी खोब्रागडे यांची मोलकरीण संगीता रिचर्ड हिला न्याय मिळाला पाहिजे आणि या संबंधातला खटला कसलाही दबावाशिवाय चालला पाहिजे, असे या संघटनांनी आवाहन केले.

या निदर्शनांचे नेतृत्व करणार्‍या योमारा वेलेज यांनी जगभरातल्या मोलकरणींना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, असे प्रतिपादन केले. केवळ अमेरिकाच नव्हे तर जगाच्या पाठीवरच्या अनेक देशांमध्ये मोलकरींवर अन्याय होत असतात अशी माहिती दिली. या निदर्शनामध्ये ५० महिला सहभागी झाल्या होत्या आणि न्यूयॉर्कमधील भारतीय व्यापारी कचेरीसमोर झालेल्या या निदर्शनाला मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.