संजय दत्त पुन्हा एकदा पॅरोलवर तुरूंगाबाहेर

पुणे- अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा येरवडा तुरूंगाबाहेर आला आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी त्याला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. त्यावरुन बराच वादही झाला होता. मात्र त्यानंतरही पुण्यातल्या येरवडा तुरुंगातून संजय दत्त शनिवारी दुपारी बाहेर पडला आहे. संजयची पत्नी मान्यताची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्याला पॅरोल देण्यात आला असल्याचे समजते.

त्यामुळे आता ख्रिसमस आणि न्यू ईयर पार्टी संजूबाबाला आपल्या घरी करता येईल. संजयला ३० दिवसांचा पॅरोल मिळाला असला तरी फर्लोप्रमाणे ही रजादेखील वाढवता येते. त्यामुळे त्याला आताही एकूण २ महिने घरी राहता येऊ शकते. एकूणच त्याचा प्रवास शिक्षामाफीच्या दिशेने सुरू आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पत्नी मान्यताची तब्येत बरी नसल्याच्या कारणावरुन संजय दत्तला ३० दिवसाची पॅरोलची रजा मंजूर झाली होती.

अभिनेता संजय दत्तच्या पॅरोलवर विविध स्तरातून टीका झाली होती. त्यातच गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या पॅरोलची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर काय झाली, हे कळायचा आतच शनिवारी दुपारी संजूबाबा जेलबाहेर पडला.