नरेंद्र मोदींची मुंबईतील सभेची तयारी पुर्ण

मुंबई- मुंबईत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची रविवारी सभा होत आहे. २२ डिसेंबरच्या या रॅलीसाठी भाजप नेते आणि कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागले आहेत. मुंबईत मोदींच्या रविवारी होणा-या महागर्जना रॅलीसाठी भाजप संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. रविवारी दुपारी वांद्र्याच्या एमएमआरडीए मैदानात मोदींची ही रॅली होत आहे. त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांची रात्रंदिवस तयारी सुरू आहे.

मोदींच्या या रॅलीसाठी ४००० खासगी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. शेजारील राज्यांमधली जनता मोठ्या प्रमाणावर मोदींच्या सभेला येण्याची शक्यता असल्याने भाजपने देशभरातून मुंबईकडे येणा-या तब्बल २२ ट्रेन्स बुक केल्या आहेत. मध्य रेल्वेच्या १२ गाड्या दादर, सीएसीटी आणि ठाण्यापर्यंत येणार आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या १० गाड्या मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि दादरपर्यंत धावणार आहेत.

एमएमआरडीएच्या ज्या मैदानात रॅली होणार आहे, तिथं वाय-फायची सुविधा देण्यात आली आहे. ही रॅली यशस्वी होण्यासाठी ५० पेक्षा जास्त थिएटर्समध्ये अॅड कॅम्पेन सुरू झाले. त्याशिवाय या रॅलीसाठी १० हजार चहावाल्यांना आमंत्रण देण्यात आले आहे.नरेंद्र मोदींच्या या रॅलीसाठी मुंबई पोलिसांनीही सुरक्षेच्या दृष्टीने पुरेपूर तयारी केली आहे. चार राज्यांत मिळालेल्या यशानंतर भाजपमध्ये सेलिब्रेशनचा माहोल आहे. आता मोदींचा हाच करिश्मा महाराष्ट्रातही चालेल अशी भाजपला आशा आहे.

Leave a Comment