टीम इंडियाची कसोटीवर पकड

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरूदध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीवर टीम इंडियाने तिस-या दिवसाअखेर आपली पकड घट्ट केली आहे. चेतेश्वर पुजाराने सहावे कसोटी शतक झळकावून विराट कोहलीच्या साथीने तिस-या विकेटसाठी १९१ धावांची अभेद्य भागीदारीही रचली आहे. त्यामुळे या कसोटीत भारताला तिस-या दिवसाअखेर दोन बाद २८४ धावांची मजल मारता आली. पहिल्या डावातल्या ३६ धावांच्या आघाडीसह टीम इंडियाची एकूण आघाडी ३२० धावांची झाली आहे.

शतकवीर चेतेश्वर पुजारा आणि शतकावर नजर रोखून असलेला विराट कोहली अजूनही मैदानात आहेत. त्या दोघांनी तिस-या विकेटसाठी १९१ धावांची अभेद्य भागीदारी रचून ही कसोटी टीम इंडियाच्या बाजूनं झुकवली आहे. या भागिदारीत कोहलीचा वाटा आहे १३२ चेंडूंत आठ चौकारांसह नाबाद ७७ धावांचा. पुजाराने २२१ चेंडूंतली नाबाद १३५ धावांची खेळी करत अठरा चौकारांनी सजवली. पुजाराच्या कसोटी कारकीर्दीतले हे सहावे शतक ठरले.

जोहान्सबर्ग कसोटीत टीम इंडियाच्या गोलंदाजांनीही कमाल केली. झहीर खान आणि ईशांत शर्मा या अनुभवी गोलंदाजांनी सहा बाद २१३ धावांवरून दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २४४ धावांत गुंडाळला. त्यामुळं टीम इंडियाला ३६ धावांची छोटीशीच, पण बहुमोल आघाडी मिळाली. झहीर आणि ईशांतनं दक्षिण आफ्रिकेच्या चार-चार फलंदाजांना माघारी धाडून त्यात मोलाची भूमिका बजावली.